काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एकाची शरणागती
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.
कुलगाम : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. ठार झालेल्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा स्वयंघोषित कमांडर शाकूर अहमद दर याचाही समावेश आहे. या चकमकीनंतर एका अतिरेक्यानं शरणागती पत्करलीये. आज दुपारी चेद्दर किमोह भागामध्ये ही चकमक झाली. अमरनाथ यात्रा तोंडावर आली असताना जम्मू-काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि लष्करानं यात्रेच्या मार्गाची कसून तपासणी सुरू केलीये. यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येतेय. या तपासणीदरम्यान चेद्दर किमोहमध्ये ३ अतिरेकी दडून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी केलेल्या कारवाईत दोन अतिरेकी ठार झाले, तर तिसरा शरण आला. जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर आत्तापर्यंत ९ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.