नवी दिल्ली : केरळच्या शबरीमला मंदीरात महिला प्रवेशावरुन सध्या वाद सुरू आहेत. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश द्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. मात्र स्थानिक तसेच कट्टर हिंदुत्ववाद्यांचा याला कडाडून विरोध आहे. पण शबरीमालाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याची घटना घडली आहे. या संदर्भातील व्हिडीओ समोर आला असून यावरुन याचे पडसाद येत्या काही दिवसात पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिंदू आणि कनकदुर्गा या साधारण चाळीशीच्या महिलांनी शबरीमला मंदिरात सकाळी 3 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास प्रवेश केला. 10 ते 50 वयोगटातील महिलांना या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी आहे. पण ही बंदी झुगारून या महिलांनी हा प्रवेश केल्याने या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अय्यपा देवाचे दर्शन घेऊन या दोन्ही महिला परतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. 



महिलांसोबत पोलिसांची तुकडी देखील होती अशी माहिती समोर येत आहे. पोलीस कर्मचारी वर्दीत आणि साध्या वेशात त्यांच्या सोबत होते. एएनआयने यासंदर्भातील व्हिडीओ समोर आणलाय. याआधी 23 डिसेंबरला 11 महिलांच्या घोळक्याने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना विरोध करण्यात आला. सेल्वी यांच्या नेतृत्वाखाली या प्रवेशाचा प्रयत्न झाला. भक्तांनी त्यांना रोखून त्यांना बाहेर पडण्यास भाग पाडले.