दिनेश दुखंडे, अयोध्या : शिवसेनेची कडवट हिंदुत्ववादी पक्ष अशी प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर निर्माण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले हेत. अयोध्यावरीतून राजकारणातली समयसुचकता दाखवत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. 'हर हिंदू कि यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार' या घोषवाक्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा सुरु केला आणि मोदी सरकारला सूचक इशारा देत संपवला. या यशस्वी अयोध्यावारीने उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणात एकदम वरच्या स्थानावर नेऊन ठेवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या व्यूहरचनेपासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास आता राष्ट्रीय राजकारणाच्या व्यूहरचनेपर्यंत येऊन पोचलाय. बाळासाहेबांसारखी आक्रमक शैली नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी अनेक वर्षं सोसली. मुळातच शांत, संयमी आणि दूरदृष्टी ठेवणारा स्वभाव असल्यानं त्यांनी बाळासाहेबांची नक्कल करण्यापेक्षा पक्षात स्वतःची शैली निर्माण करण्याचा प्रयत्न केला...मोदींच्या लोकप्रियेतच्या लाटेवर स्वार होत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. पण या यशाचं श्रेय हे मोदीप्रणित भाजप घेत असल्याचे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे सावध झाले. मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेत विरोधी पक्षांचा टिकाव लागत नसताना उद्धव ठाकरेंनी स्वबळावर शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले. 


आता राम मंदिर निर्माणाचा मुद्दा हातात घेत त्यांनी राष्ट्रीय राजकारणात झेप घेतली आहे. शक्तिप्रदर्शन आणि इव्हेंट म्हणून त्यांचा अयोध्या दौरा यशस्वी ठरला. या दौऱ्यातून त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधीश भाजपवर दबाब, स्वतःची राष्ट्रीय नेता म्हणून प्रतिमा तयार करणं आणि उत्तर भारतीय मतपेढीला आकर्षित करणं हे तीन हेतू साध्य करण्यात त्यांना यश आल्याचं विश्लेषण केलं जातं आहे.


जर बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे ही भूमिका मांडत बाळासाहेबांनी राष्ट्रीय राजकारणात वेगळी उंची गाठली होती. आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत राम मंदिर निर्माणासाठी दबाव निर्माण करतायत. मंदिर निर्माणाबाबत असलेल्या रेट्यामुळे मोदी सरकारला आगामी काळात अध्यादेश काढावा लागला तर श्रेयाच्या नामावलीत उद्धव ठाकरेंचा क्रमांक सर्वात वरचा असेल आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचलीतला तो महत्वाचा टप्पा मानला जाईल.