अयोध्या: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शनिवारपासून सुरु होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी घरामध्ये पुढील काही दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा करायला सुरुवात केलेय. एखादा अनुचित प्रसंग उद्भावल्यास गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांकडून ही खबरदारी घेतली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासोबतच अयोध्येत विहिंपच्या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या धर्मसभेलाही जवळपास दोन लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भर पडणार आहे. अचानक झालेल्या या गर्दीमुळे अयोध्येतील नागरिक धास्तावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, दुसरीकडे नागरिकांना उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याविषयी उत्सुकताही आहे. अयोध्येतल्या महत्त्वाच्या चौकात उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी फलक लागले आहेत. या फलकांवर उद्धव ठाकरेंचा चेहरा दिसत असला तरी लोकांमध्ये 'बाल ठाकरे का लडका आ रहा है' अशी चर्चा रंगली आहे.


गेल्या काही दिवसांपासून अयोध्येत शिवसैनिक आणि विहिंपचे कार्यकर्ते दाखल होत आहेत. या गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच लोकांनी घरात जीवनावश्यक वस्तुंची जमवाजमव करायला सुरुवात केलीय. काही दिवस घरीच राहावे लागल्यास कोणतीही अडचण येऊ नये, याची तयारी स्थानिकांनी केली आहे. 


याशिवाय, शहरातील व्यापारी वर्गही काहीसा धास्तावला आहे. यावेळी हिंसक घटना घडल्यास आपल्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, असे व्यापाऱ्यांना वाटते. 


उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत. प्रथम संत महंतांचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे शरयू नदीच्या आरतीला उपस्थित राहतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता रामललाच्या दर्शनला जातील. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल.