उद्धव ठाकरे राहुल गांधींवर नाराज, सोनियांशीही चर्चा करणार
राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत.
मुंबई : राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना काँग्रेसच्या नेत्यांना पोहोचवल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणावरून उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. राहुल गांधींच्या अशा वक्तव्यांमुळे राज्यात सरकार चालवताना अडचणी येतील, असं उद्धव ठाकरे सोनिया गांधींशी बोलून सांगू शकतात, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुनावलंय.
'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशी दोन ट्विट संजय राऊत यांनी केली आहेत.
यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट करुन अटल बिहारी वाजपेयी यांची सावरकरांविषयीच्या काही ओळी ट्विट केल्या आहेत.
काय म्हणाले राहुल गांधी
रेप इन इंडिया वक्तव्यामुळे आधीच टीकेची झोड उठली असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतलाय. सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीय. मरण पत्करेन, पण रेप इन इंडिया वक्तव्यावरून माफी मागणार नाही. माझं नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, असं राहुल गांधी म्हणाले.