आणखी एक बँक घोटाळा, सीबीआयकडून १३९४ कोटी रुपयांचा गुन्हा दाखल
पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे.
हैदराबाद : पंजाब नॅशनल बँकेनंतर आता आणखी एक नवीन घोटाळा समोर आला आहे. सीबीआयनं हैदराबादच्या टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांच्या प्रमोटर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीनं वेगवेगळ्या ८ बँकांना १३९४ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. यामध्ये युनियन बँकेचे ३१३ कोटी रुपये आहेत. याप्रकरणी सीबीआयकडून टोटेम इन्फ्रास्ट्रक्चरच्या चौकशीला सुरुवात केली आहे. टोटेम इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक देश सोडून फरार झाल्याची माहिती आहे.
टोटेम इन्फ्रास्ट्रक्चरनं ८ बँकांमधून १३९४.४३ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या बँकांनी २०१२मध्ये या कर्जाला एनपीएमध्ये टाकलं होतं. बँकांनी जेव्हा कंपनीवर कर्ज परत करण्याबाबत दबाव टाकला तेव्हा कंपनीचे संचालक फरार झाले.
युनियन बँकेनं केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयनं टोटेम कंपनी त्यांचे प्रमोटर आणि निदेशक टोटेमपुडी सलालिथ आणि टोटेमपुडी कविता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. या कंपनीचे मालक कुठे आहेत याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
स्टेट बँकेलाही लावला चुना
पीएनबी गैरव्यवहारानंतर आता लगोपाठ बँकांचे नव-नवीन गैरव्यवहार समोर येत आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात ज्वेलरी व्यापाराशी संबंधीत आणखी एका कंपनीने बँकांना सुमारे ८२४. १५ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जानेवारीमध्ये सीबीआयला चेन्नईच्या कनिष्क गोल्ड या साखळी समूहाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कनिष्क गोल्डने १४ बँकेतून सुमारे ८२४ कोटी पेक्षा अधिक लोन घेतले आहे.
मॉरिशसमध्ये आहे कनिष्क गोल्डचे प्रमोर्टर्स
कनिष्क गोल्डचे रजिस्टर्ड ऑफिस तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये आहे. याचे प्रमोटर्स आणि डायरेक्टर भूपेश कुमार जैन आणि त्यांची पत्नी नीता जैन आहे. बँकर्सचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बँकांच्या माहितीनुसार हे दोघे सध्या मॉरिशसमध्ये आहेत. दरम्यान या प्रकरणात सीबीआयने अजूनही एफआयआर दाखल केलेली नाही.
SBI समवेत १४ बँकांचे कर्ज
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार कनिष्क गोल्डला कर्ज देणाऱ्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियासह खासगी आणि सरकारी १४ बँकांचा समावेश आहे. २५ जानेवारीला सीबीआयने लिहिलेल्या लेटरमध्ये एसबीआयने आरोप लावला होता, की कनिष्क गोल्ड रेकॉर्ड बदलण्याचा प्रयत्न करीत आहे आणि रात्रीतून दुकान बंद करत आहेत. एकूण ८२४ कोटी रुपयांच्या व्याजाचा विचार केला तर ही रक्कम १००० कोटीच्या घरात जाते.
कोणत्या बँकेचे किती कर्ज
स्टेट बँक ऑफ इंडिया: 215 कोटी
आईसीआईसीआई बँक: 115 कोटी
यूनियन बँक ऑफ इंडिया: 50 कोटी
सिडिकेट बँक: 50 कोटी
बँक ऑफ इंडिया: 45 कोटी
IDBI बँक: 45 कोटी
यूको बँक: 40 कोटी
तमिलनाड मर्केंटाइल बँक: 37 कोटी
आंध्रा बँक: 30 कोटी
बँक ऑफ बड़ौदा: 30 कोटी
HDFC बँक: 25 कोटी
सेंट्रल बँक: 20 कोटी
कॉरपोरेशन बँक: 20 कोटी