अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीचा भाव वधारला
२०१८-१९ या आर्थिक वर्षात भारतामधील सोन्याची आयात तीन टक्क्यांनी कमी झाली होती.
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलावहिला अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या अर्थसंकल्पात सोने आणि मौल्यवान धातुंवरील आयात शुल्कात वाढ केल्याची घोषणा केली. त्यामुळे आता मौल्यवान धातुंवरील आयात शुल्क १२.५ टक्के झाले आहे. या घोषणेचे पडसाद तात्काळ सराफा बाजारात उमटताना दिसले.
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काहीवेळातच सोने आणि चांदीचे मूल्य वधारले. कमोडिटी बाजारात सोन्याचे मूल्य ७३१ रुपयांनी वाढले. तर चांदीचा दर प्रतिकिलो ३४९४८ रुपयांवर जाऊन पोहोचला.
गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत सराफा व्यापाऱ्यांकडून आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली जात होती. वाणिज्य मंत्रालयाकडे यासाठी पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला होता. मात्र, सरकारने मौल्यवान धातुंवरील आयातशुल्क आणखी वाढवण्याला प्राधान्य दिले.
२०१८-१९ या आर्थिक वर्षात भारतामधील सोन्याची आयात तीन टक्क्यांनी कमी झाली होती. यामुळे सरकारला चालू खात्यातील तूट नियंत्रणात ठेवता येते. सोन्याच्या आयातीमुळे परदेशी चलनाची गंगाजळीही कमी होते. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढते. मात्र, आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे या गोष्टीला आळा बसेल.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात भारताने ३३.७ अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीचे सोने आयात केले होते. २०१६-१७ मध्ये २७.५ अब्ज डॉलर्स आणि २०१५-१६ मध्ये भारताने ३१.८ अब्ज डॉलर्सचे सोने आयात केले होते. भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला विशेष महत्त्व असल्यामुळे जगामध्ये सर्वाधिक सोने आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा लागतो.