मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार  (Union cabinet expansion) येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता असून विस्तार संदर्भात हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm narendra modi) यांच्या टीममधून कोणाला डच्चू मिळणार, कोणाचं खातं बदलणार आणि कोणत्या नवीन चेहऱ्यांची वर्णी लागणार, या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी सरकारला (modi govt) दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची चर्चा सुरु आहे. मागच्या काही आठवड्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी पंतप्रधान मोदींच्या गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याबरोबर मॅरेथॉन बैठका सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकेल.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगली  कामगिरी  नसलेल्या मंत्र्यांना  केंद्रीय  मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांची नावं चर्चेत आहेत. याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनवाल, त्रिवेंद्र सिंह रावत, अनुप्रिया पटेल, सुशील मोदी, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम आणि उत्तर प्रदेशचे सत्यदेव पचौरी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.


राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? 


पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे (narayan rane) यांना स्थान दिलं जाऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. निरोप आल्यावर केंद्रात जाऊ, अशी प्रतिक्रियाही राणे यांनी दिली आहे. नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राणे हे बराच काळ शिवसेनेत होते. तसंच त्यांना मुंबई महापालिकेतील खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो.