देशातील गद्दारांना.... प्रचारसभेतील आक्षेपार्ह घोषणेमुळे अनुराग ठाकूर अडचणीत
भाजपकडून ध्रुवीकरणाचा आवडता डाव खेळला जात आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर एका वादग्रस्त घोषणेमुळे अडचणीत आले आहेत. ते सोमवारी दिल्लीतील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भर सभेत 'देश के गद्दारोंको.... गोली मारो', असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला.
अनुराग ठाकूर यांचे हे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचे आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. प्रशांत भूषण यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर अनुराग ठाकूर यांच्यावर टीकेची झोड उठली. अनुराग ठाकूर यांना एव्हाना तुरुंगात असायला पाहिजे होते, असे प्रशांत भूषण यांनी म्हटले.
तर काँग्रेसकडूनही ठाकूर यांच्यावर निशाणा साधण्यात आला. मोदी सरकारपुढे जनतेपुढे मांडायला ठोस असे काहीच नाही. त्यामुळे भाजपकडून ध्रुवीकरणाचा आवडता डाव खेळला जात आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
रिठाला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अनुराग ठाकूर, हंसराज अहिर यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी भाषणादरम्यान 'देश के गद्दारो को' असे उच्चारताच जमावाने 'गोली मारो' अशा घोषणा दिल्या. व्यासपीठावरील एका नेत्यानेही हीच घोषणा दिली. मात्र, अनुराग ठाकूर यांनी लगेच त्या नेत्याला रोखले. मात्र, भाजपच्या नेत्यांना ठरवून जमावाकडून अशाप्रकारच्या घोषणा वदवून घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
या सगळ्या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने स्थानिक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.