Corona Positive : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांना पुन्हा कोरोनाचा लागण, ट्विट करत दिली माहिती
देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. केंद्रीय मंत्री देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरवायला सुरुवात केलीये. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः ट्विट करून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.
कोविडची लागण झाल्याची माहिती देताना स्मृती इराणी यांनी ट्विट केले आणि म्हटले की, 'राजेंद्र नगरमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याबद्दल मी नागरिकांची माफी मागते, कारण माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी राजेंद्र नगरच्या लोकांना आवाहन करते की राजेश भाटिया यांना मतदान करा आणि त्यांचा विजय निश्चित करा.'
दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघात 23 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप उमेदवार राजेश भाटिया यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यासाठी त्या राजेंद्र नगरमध्ये पोहोचणार होत्या. मात्र कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या क्वांरटाईन झाल्या आहेत.
स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाल्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी त्यांना 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली होती.