उत्तर प्रदेश : देशाच्या राजकीय पटलावर सध्या सुरु असणाऱ्या सर्व हालचाली पाहता येत्या काळातील लोकसभा निवडणूकांकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप या दोन्ही पक्षांमध्ये सध्या पंतप्रधानपदाकडे आशावादी नजरेने पाहण्याऱ्यांची नावंही समोर येत आहेत. काँग्रेसकडून समोर येणारं नाव म्हणजे राहुल गांधी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे राहुल गांधी पंतप्रधान पदाची स्वप्न पाहत असतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या अमेठी मतदार संघात देशाचे भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्या नावाचं समर्थन करणारे फलक लावण्यात आल्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली. 


अमेठी दौऱ्यावर असणाऱ्या इराणी ही पोस्टरबाजी पाहून म्हणाल्या, 'राहुल गांधी यांना महायुतीत अशा प्रकारचा (पंतप्रधान बनण्याचा) आशीर्वाद ना मायावती यांनी दिला आहे, ना अखिलेश यांनी दिला आहे आणि ना ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांना ही मुंगेरीलालची स्वप्न पाहण्यापासून कोणीच रोखलेलं नाही.'



छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान येथे काँग्रेसच्या वाट्याला यश आल्यानंतर अमेठीमध्ये त्यांच्या नावाचे पोस्टर झळकल्याचं पाहायला मिळालं. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या दौऱ्यात इराणी यांनी याच पोस्टरबाजीविषयी बोचरी टीका केली. त्यामुळे आता 'मुंगेरीलालची स्वप्न....', असा उल्लेख करत राहुल गांधी यांना टोला लगावणाऱ्या इराणी यांना काँग्रेसकडून काही उत्तर मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.