पद्मावती सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्याची मागणी
मागणी उत्तर प्रदेश सरकारनं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
मुंबई : सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला संजय लीला भन्सालींचा पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकावं, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारनं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका
योगी आदित्यनाथ सरकारनं केंद्राला लिहिलेल्या पत्रात पद्मवतीच्या प्रदर्शनानं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे जोपर्यंत वादावर तोडगा निघत नाही, तोवर चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षांकडून प्रतिक्रियेस नकार
दरम्यान, पद्मावती चित्रपट अद्याप बघितलेलाच नाही. त्यामुळे त्याविषयी प्रतिक्रिया देणं शक्य नसल्याचं सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी म्हटलं आहे.
राजस्थानातूनही धमकी
दुसरीकडे, राजस्थानमधील करणी सेनेने, पद्मावती सिनेमा रिलीज झाल्यास, अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाक कापू अशी धमकी दिली आहे.