उत्तर प्रदेशात भाकरी फिरणार? योगी नाही तर `या` बड्या नेत्यासोबत पंतप्रधान मोदींची तासभर चर्चा
UP BJP Politics: दिल्लीच्या सत्तेवर जाणारा मार्ग म्हणजे उत्तर प्रदेश, अशातच युपीच्या राजकारणाचं वातावरण तापलंय. त्याला कारण भूपेंद्र चौधरी आणि (Bhupendra Chaudhary met PM Modi) पंतप्रधान मोदींची भेट..!
Bhupendra Chaudhary met PM Modi : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठी धक्का बसला तो उत्तर प्रदेशात... युपीमध्ये भाजपची मोठी पझडम झाली. अखिलेश यादवच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली अन् भाजपला बॅकफूटवर पाठवलं. अशातच आता लोकसभा निवडणुकीतून मोठा धडा घेत भाजपने मोठी पाऊलं उचलण्यास सुरूवात केल्याचं पहायला मिळतंय. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या हालचालींना वेग आलाय. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, अशी चर्चा होत होती. अशातच आता उत्तर प्रदेशच्या मोठ्या नेत्यासोबत पंतप्रधान मोदींनी तासभर चर्चा केली आहे.
उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय भूपेंद्र चौधरी यांनी जेपी नड्डा यांची देखील भेट घेतल्याने आता चर्चेला उधाण आलंय. केशव प्रसाद मौर्य आणि भूपेंद्र चौधरी मंगळवारपासून दिल्लीत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवावर दिल्लीश्वर नाराज आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात भाकरी फिरणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
नुकतंच, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. सरकारपेक्षा संघटना मोठी आहे आणि संघटनेपेक्षा कोणीही मोठा नाही, असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं होतं. त्यांचा निशाणा योगी आदित्यनाथ यांच्यावरच होता, असं राजकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं होतं. अशातच आता उत्तर प्रदेशात नेमकं काय शिजतंय? यावर अनेक चर्चा होताना दिसत आहेत.
दरम्यान, सध्याच्या घडामोडींमध्ये जेपी नड्डा फँटफूटवर खेळताना दिसत आहेत. त्यांनी केशव प्रसाद मौर्य आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. आगामी निवडणुकांवर भाजपची रणनिती कशी असावी? यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप हायकमांडने दोन्ही नेत्यांना सरकार आणि संघटना यांच्यात समन्वय राखण्याचे आणि अनावश्यक वक्तव्यांना आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती देखील मीडिया रिपोर्टनुसार समोर आली होती.