मुंबई : लोकसभेच्या निवडणूकांची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणूकांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणूकांचा निकाल बऱ्याच राजकीय घडामोडींना प्रारंभ करुन देणारा ठरला. त्यातच हिंद्दीपट्ट्याचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजपला मिळालेला धक्का पाहता आता पक्षामध्ये नेतेमंडळींनी आत्मचिंतनास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रचारसभांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्य़ा योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक निकालांवर आपली प्रतिक्रिया दिली. बिहारच्या एकदिवसीय दौऱ्यावर असतानाच पटना येते माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपले विचार मांडले. 'जनतेच्या समर्थनामुळे आम्हाला पुढची लढाई लढणं अधिक सोपं झालं आहे', असं ते म्हणाले. 


'मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये काहीजणांनी लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगलंच प्रदर्शन केलं', असंही त्यांनी स्पष्ट करत जणू पराभवाचं विश्लेषणच केलं. 



मतांची संख्या जास्त असूनही भाजप पराभूत 


मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या तुलनेत भाजपकडे एक लाख मतंसंख्या जास्त होती. पण, असं असूनही सत्ताधारी पक्षाला निकालामध्ये मोठा धक्का बसला. काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक जागांवर निवडून आले आणि भाजप मागे पडला. राजस्थानमध्ये भाजपला ३८.८ टक्के आणि काँग्रेसला ३९.३ टक्के मतं मिळाली. 


तरीही म्हणतात भाजपला जनतेचा पाठिंबा.... 


'निवडणूकांचे निकालच सांगत आहेत, की जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे या मतावर ठाम राहत त्यांनी हनुमानाविषयी केलेल्या आपल्या वक्तव्याला काहीजणांनी चुकीच्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवलं, ही बाब अधोरेखित केली. पराभव सावरण्याचा प्रयत्न करताना, 'मी बजरंगबलीची जात सांगितली नव्हती. तर, देवत्व हे कोणत्याही व्यक्तीच्या कृतीमुळे प्राप्त होतं. ते कोणालाही लाभू शकतं. याचच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बजरंगबली', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.


लोकशाही राष्ट्रामध्ये पराभव आणि विजय हे एकाच तराजूचे दोन पारडे आहेत. त्यामुळे विजयाप्रमाणेच आम्ही पराभवाचाही स्वीकार करतो, असं सांगत देशात लोकशाही कायम राहिली पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.