Boyfriend Fired At Girlfriend: उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने प्रेयसीला गोळी मारल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आझमगड जिल्ह्यातील जीयनपुर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या लाटघाट येथील एका ढाब्यावर घडली. ढाब्यावर अचानक गोळी चालवण्याचा आवाज आल्याने एकच खळबळ उडाली. गोळी चालवण्याचा आवाज आल्यानंतर आधी एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर सर्वजण जिकडून आवाज आला त्या दिशेने धावले. जेव्हा लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. घटनास्थळी एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला गोळी मारली होती आणि त्यानंतर बाथरुममध्ये जाऊन स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार जीयनपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये राहणारा विशाल हा येथील एका महाविद्यालयामध्ये शिकत होता. याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीबरोबर तो लाटघाट येथील एका ढाब्यावर आला होता. या दोघांमध्ये कोणत्यातरी विषयावरुन वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या विशालने आधी त्या तरुणीवर गोळी चालवली. त्यानंतर स्वत:ला बाथरुममधून कोंडून घेत आणखीन एक गोळी स्वत:वरच चावली. या घटनेमध्ये विशालचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्याबरोबरच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.


आधी जेवले अन् नंतर...


सध्या पोलिसांची एक फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरील वेगवेगळ्या गोष्टींचे नमुने गोळा करत आहे. या प्रकरणासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक राहुल रुशिया यांनी घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला. आधी हे दोघे ढाब्यावर आले. त्यांनी येथे भोजन केलं. त्यानंतर त्यांनी ढाब्यावरच एक रुम भाड्याने घेतला. हे दोघेही या रुममध्ये निघून गेले. त्यानंतर काही वेळाने या रुममधून गोळीचा आवाज आला आणि एकच गोंधळ उडाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयामध्ये दाखल केलं. 


अनेक प्रश्नांची उत्तर अनुत्तरित


पोलिसांनी बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला विशालचा मृतदेहही पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. विशालने गोळी का चालवली, या दोघांमध्ये कोणत्या कारणावरुन वाद झाला, रुममध्ये नक्की काय घडलं यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. या जखमी तरुणीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर बऱ्याचश्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे.