UP Crime : उत्तर प्रदेशातील (UP News) गाझियाबादमधील ओयो हॉटेलच्या (Oyo Hotel) खोलीत नवविवाहित महिला आणि तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (UP Police) या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या गळ्यात स्कार्फ बांधला होता आणि खोलीतच तो छताच्या पंख्याला लटकला होता. तर महिलेची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये प्रियकराने नवविवाहित प्रेयसीची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मोदीनगरमधील कादराबाद भागात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्येपूर्वी प्रियकराने प्रेयसीच्या पतीला व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर पतीने हॉटेलमध्ये धाव घेतली. त्यानंतर याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडून आत पाहिलं तर दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करून तपासणीसाठी पाठवले आहेत.


हापूर जिल्ह्यातील मधू (22) हिचा मोदीनगर येथील मोहितसोबत दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मधूचे हे दुसरे लग्न होते. पहिले लग्न दोन वर्षांपूर्वी मेरठमधील खारखोडा जिल्ह्यातील बिजौली गावात रिंकूसोबत झाले होते. पण अवघ्या सहा महिन्यांतच रिंकूचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. गावातल्या एका महिलेने मधुचा हा विवाह लावून दिला होता. रिंकूच्या मृत्यूनंतर त्या महिलेचा मुलगा हिमांशू (22) याचे मधुसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मात्र दोघांच्याही कुटुंबीयांना या गोष्टीची माहिती नव्हती. हिमांशू शिकत होता. त्यामुळे मधूने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.


रविवारी हिमांशू मधूला भेटण्यासाठी मोदीनगरला आला होता. मधू औषध घेण्याच्या बहाण्याने घरातून निघाली होती. त्यानंतर दोघेही बाईकवरुन एका ओयो हॉटेलमध्ये गेले आणि त्यानंतर मधूने आपला फोन बंद केला. मधूचा पती मोहित तिला वारंवार फोन करत होता. मात्र फोन बंद होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास मधूच्या मोबाईलवरुन हिमांशूने मोहितला व्हिडीओ कॉल केला आणि मधूचा मृतदेह दाखवत शिवीगाळ सुरु केली. यानंतर हिमांशूने मधूच्या भावालाही ही माहिती दिली. त्यानंतर हिमांशूने गळफास घेत आत्महत्या केली.


"हिच्यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. एक वर्षापासून ही मला त्रास देत आहे. आता मी तिचे आयुष्य उध्वस्त करणार. मी कोणाला घाबरत नाही," असे हिमांशू मोहितला व्हिडीओ कॉलवर सांगत होता. मोहित त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण हिमांशू कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मधूचे लग्न मोहितसोबत झाल्यापासून हिमांशू चिंतेत होता.