हातगाडीवर कपडे विकणाऱ्या आधी आईला फसवलं नंतर मुलीसोबत केली लग्नाची मागणी; आरोपीला अटक
UP Crime : मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आईने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत कोर्टात हजर केले आहे. कोर्टानं त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP News) गोरखपूरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. हातगाडीवर कपडे विकणाऱ्या व्यक्तीने एका विवाहित महिलेवर अत्याचार करत तिच्याच मुलीचा विनयभंग (molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी गेल्या दीड वर्षांपासून पीडित महिलेसोबतच राहत होता. मात्र त्याला महिलेच्या 17 वर्षांच्या मुलीसोबत विवाह करायचा होता. महिलेला ही गोष्ट कळताच तिने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र त्याने माघार घेतली नाही. उलट त्याने मुलीला आणि तिच्या आईला मारहाण करायला सुरुवात केली. शेवटी कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार नोंदवली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (UP Police) आरोपीला अटक केली आहे.
गोरखपूरच्या राजघाट परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलासोबत आणि तिच्या मुलीसोबत हा सर्व खळबळजनक प्रकार घडला आहे. आरोपीच्या कृत्यांना वैतागून शेवटी महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद शाहरुख खान असून तो मुरादाबाद येथील रहिवासी आहे. मात्र सध्या तो हरैया गिडा येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.
तिथल्याच आसपासच्या परिसरात आरोपी शाहरुख हा हातगाडीवरुन कपडे विकत होता. त्याचदरम्यान त्याची ओळख रेहमत नगरमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेसोबत झाली. हळूहळू त्यांचे बोलणे वाढले. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते एकत्र राहू लागले. दोघे एकत्र आल्याची माहिती महिलेच्या पतीलाही मिळाली होती. पण त्याने याबाबत आक्षेप घेतला नाही. महिलेचा पतीही तिथल्याच परिसरात अंडी विकायचा. एकत्र राहत असताना आरोपीने अनेकदा जबरदस्तीने महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले होते. एवढं सगळं झाल्यानंतरही आरोपीचा महिलेच्या 17 वर्षीय मुलीवर डोळा होता. त्याने माझा तुझ्या मुलीसोबत विवाह लावून दे अशी अजब मागणी सुरु केली. त्यानंतर शाहरुखने मुलीशी विवाह करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. महिलेने विरोध केल्यावर करताच आरोपीने तिला मारहाणही केली.
आरोपीने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. शनिवारी संध्याकाळी महिला औषध घेण्यासाठी बाहेर गेलेली असताना मुलगी एकटीच होती. त्यावेळी मुलीला एकटी पाहून आरोपी शाहरुखने खोलीला कुलूप लावलं आणि तिचा विनयभंग केला. वरच्या खोलीत राहणाऱ्या दुसऱ्या भाडेकरुने मुलीचा आवाज ऐकला. त्यांनी विचारणा करताच आरोपीने मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने आईला सगळा प्रकार सांगितला. पीडित महिलेने तात्काळ राजघाट पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी राजघाट पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तिथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.