मला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय... विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू
UP Crime : उत्तर प्रदेशमध्ये जीएसटी कार्यालयात एका ट्रक चालकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ट्रक चालकाला थांबवून ठेवल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
Crime News : जीएसटी (GST) अधिकार्यांच्या मनमानीमुळे एका ट्रक चालकाच्या कुटुंबाला इतका मोठा फटका बसला आहे की, त्यांचे दुःख ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. कानपूरमध्ये (UP Crime) जीएसटी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान पंजाबकडे (Punjab) भंगार घेऊन जाणारा ट्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी पकडला होता. त्याची चौकशी सुरु असताना माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे असे ट्रक चालकाने सांगितले होते. पण अधिकाऱ्यांनी ऐकले नाही आणि ट्रकचालकाला थांबवून ठेवलं. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्काने ट्रकचालक बापानेही प्राण सोडले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
जीएसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
कानपूरमध्ये ट्रक चालकाचा कोठडीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरी जात असताना करचुकवेगिरीच्या संशयावरून त्याला जीएसटी अधिकाऱ्यांनी अडवले आणि थांबवून ठेवले होते. मुलाच्या मृत्यूची माहिती कळल्यानंतरही त्याला जाऊ दिले नाही असा आरोप करण्यात आला आहे. 23 जुलै रोजी जीएसटी कार्यालयात ट्रक चालकाचा मृतदेह सापडला होता. ट्रक चालकाच्या कुटुंबियांना आता त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी दोन जीएसटी अधिकारी आणि त्यांच्यासोबत उपस्थित काही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाच्या मृत्यूची माहिती देऊनही सोडलं नाही
बलबीर सिंग असे मृत ट्रक चालकाचे नाव असून ते पंजाबच्या लुधियानाचे रहिवासी होते. 20 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते कानपूर मंडी येथून गोविंदगडला पंजाबसाठी माल घेऊन निघाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी बलबीर सिंग यांना त्याच्या लहान मुलाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मृत बलबीर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला सांगितले की, त्यांचा ट्रक काल रात्रीपासून कानपूर राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी अमित मोहन आणि पारस नाथ यादव यांनी रोखून धरला होता. लहान मुलाच्या मृत्यूची बातमीही बलबीर यांनी अधिकाऱ्यांना सांगितली, पण तरीही अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून ठेवले होते. बलबीर यांचा फोनही जप्त करण्यात आला होता.
तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती
त्यानंतर जीएसटी अधिकाऱ्यांसह असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बलबीर यांना मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. बलबीर यांचा ट्रक जीएसटी कार्यालयाबाहेरच उभा होता. बलबीर यांना ट्रकच्या आत राहण्यास सांगितले होते. 23 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता ट्रकच्या मालकाला बलबीर यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. ट्रकच्या केबिनमध्येच बलबीर यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. तपासादरम्यान बलबीर यांच्या तब्येत बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. मात्र अद्याप बलबीर यांचा मृत्यू कसा झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, जेव्हा बलबीर यांना धाकट्या मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता. मुलाच्या मृतदेहाचा फोटो बलबीर यांनी घरातील सदस्यांना मागितला होता. फोटो बघून त्यांना मुलाचा मृत्यू झाला आहे यावर विश्वास बसला. 14 वर्षांचा लहान महेश दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.