Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये नवजात बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी (transgender) त्याचा जीव घेतला आहे. तृतीयपंथीयांनी हिसकावून घेतल्याने नवजात मुलीचा मृत्यू झाला. वाद झाल्यानंतर संतापलेल्या तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीला खाली आपटलं आणि तिचा मृतदेह घरात फेकून दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी (UP Police) मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं सर्वानाच हादरवून सोडलं आहे. आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथींच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादात एका मुलीचा जीव गेला आहे. दोन गटांच्या वादात दोन महिन्यांची मुलगी खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. तृतीयपंथीयांनी आपल्या मुलीला बेदम मारहाण केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. मुरादाबाद जिल्ह्यातील दिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुऱ्हाणपूर गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बुऱ्हाणपूर गावातील सद्दाम अली यांच्या पत्नीने दोन महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. या जोडप्याने तिचे नाव अनायरा ठेवले. घरी सगळे तिला भुरी म्हणत होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही तृतीयपंथी आशीर्वाद देण्यासाठी आले होते. इतक्यात तृतीयपंथीयांचा दुसरा गटही तिथे आला. दोघांमध्ये आशीर्वाद देण्यावरून जोरदार भांडण झाले. दोघेही सद्दाम यांच्या घरात वाद घालत होते. हा वाद पाहून अख्ख गाव तिथे जमला. एका तृतीयपंथीयाने अनायराला मांडीवर घेतले होते. वाद सुरू असताना दोघांमध्ये मुलीवर भांडण सुरू झाले. त्याचवेळी मुलगी तृतीयपंथीयाच्या हातातून खाली पडली. या घटनेनंतर घरात लोक जमू लागल्यावर तृतीयपंथीयांनी तेथून पळ काढला. कुटुंबीयांनी मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी अनायराला मृत घोषित केले.


दुसरीकडे, घरात कोणीही नसताना तृतीयपंथी तिथे आले आणि त्यांनी पैसे मागितले. मुलीच्या आईने कुटुंबियातील लोक आल्यावर तुम्ही या असे तृतीयपंथीयांना सांगितले. तृतीयपंथीयांनी हे ऐकले नाही आणि मुलीला हिसकावून घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे मुलगी पडून जागीच मरण पावली, असा आरोप कुटंबियांनी केला आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयांमध्ये झालेल्या वादातून मुलीचा जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. याचा तपास केला जात आहे. दुसरीकडे, अभिनंदन करण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी मुलीला हिसकावून खाली फेकल्याचे सद्दामचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी आपल्या तक्रारीत मुलीच्या मृत्यूची माहिती दिली आहे. अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.