एका कोल्ड्रिंकची किंमत 16,400 रुपये! ऑनलाईन डेटिंगवर ओळख, मुलीने भेटायला बोलावलं आणि...
Online Dating Fraud : ऑनलाईन डेटिंगवरुन ओळख वाढवत तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच मुलींसह एकूण आठ जणांना अटक केली आहे.
Online Dating Fraud : एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही कोल्ड्रिंक मागवलं तर फारतर तुम्हाला 40 ते 50 रुपये द्यावे लागतात. हॉटेल फाईव्ह स्टार किंवा सेव्हन स्टार असेल तर त्याच कोल्ड्रिंकची किंमत 400-500 रुपये इतकी असू शकते. पण एका कोल्ड्रिंकसाठी तुमच्या हातात 16,400 रुपयांचा बिल ठेवण्यात आलं, तर याचा अर्थ तुमची मोठी फसवणूक केली जात आहे. दिल्लीतल्या एका तरुणाला ऑनलाईन डेटिंगच्या नादात असंच फसवणूकीला सामोरं जावं लागलंय. ऑनलाईन डेटिंगच्या नादात हा तरुण दिल्लीतून गाझियाबादमध्ये पोहोचला. पण ज्यावेळी त्याला खरी परिस्थिती समजली तेव्हा आपण फसवलो गेल्याचं त्याल कळलं. पण या तरुणाने हुशारी दाखवत संपूर्ण रॅकटेचा भांडाफोड केला. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच मुलींसह आठ जणांना अटक केली आहे.
व्हॉट्सएपवर डेटिंग मेसेज
दिल्लीतल्या या तरुणाच्या मोबाईलवर 21 ऑक्टोबरला व्हॉट्सएपवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये एक मुलीने तरुणाला डेटिंगसाठी गाझियाबादमध्ये बोलावलं. तरुण खुश झाला आणि त्या तरुणीला भेटण्याची स्वप्न पाहू लागला. दुसऱ्याच दिवशी तो आपली कार घेऊन गाझियाबादमधल्या कौशंबी मेट्रो स्टेशनजवळ पोहोचला. या ठिकाणी एक मुलगी त्याची वाट पाहात होती. सुंदर मुलीला पाहून हा तरुण आनंदित झाला. दोघांनी एकमेकांची ओळख करुन घेतली. त्यानंतर मुलीने जवळच्याच एका हॉटेलमध्ये जाण्याचा आग्रह केला. मुलीच्या सांगण्यावरुन टायगर कॅफे नावाच्या हॉटेलमध्ये गेला. इथपर्यंत सर्व काही ठिक होतं. तरुणाला कसलाच संशय आला नाही.
कॅफेमध्ये जाताच तरुणाला संशय आला
पण मुलीबरोबर टायगर कॅफेमध्ये प्रवेश करतातच तरुणाला काही तरी गडबड असल्याचा संशय आला. कॅफेत त्या दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. इतकंच नाही तर हॉटेलच्या बाहेर नावाचा साईनबोर्डही नव्हता. तरुणाच्या मनात पाल चुकचुकली. त्याने मुलीच्या नकळत लगेच आपल्या मोबाईलवरुन जवळच्या मित्राला आपलं लाईव्ह लोकेशन शेअर केलं आणि मेसेज करत इथं काहीतरी गडबड असल्याचा मेसेज केला.
कोल्ड्रिंगचं बील 16,400 रुपये
तरुणाचा संशय अगदी खरा ठरला. मुलीने मागवलेल्या कोल्ड्रिंकचं बील 16,400 रुपये देण्यात आलं. पण हे बिल भरण्यास तरुणाने नकार दिला आणि हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी निघाला. पण अचानक दोन ते तीन गुंडांनी त्याला घेरलं आणि त्याला धमकी देत पुन्हा खुर्चीवर बसवण्यात आलं. या गुंडांनी तरुणाकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली. या दरम्यान तरुणाने चालाखीने आपल्या मित्राला फोन लावला आणि फोन स्पीकरवर ठेवला. तरुणाच्या मित्राने हा सर्व प्रकार ऐकला आणि तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिासांनी तत्परतेने कारवाई करत टायगर कॅफेवर छापा मारला. कॅफेमधून पोलिसांनी पाच मुली आणि तीन मुलांना अटक केली. याप्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणांना फसवाये हनी ट्रॅपमध्ये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीतल्या पाच मुलींनी वेगवेगळ्या डेटिंग अॅपवर स्वत:चे प्रोफाईल तयार केले होते. या एपच्या माध्यमातून त्या तरुणांना टायगर कॅफेमध्ये भेटायला बोलवायचे आणि खाण्या-पीण्याच्या नावाखाली वाट्टेल तितकं बिल वसूल करायचे. पैसे न दिल्यास तरुणांना बंदी बनवून हॉटेलमध्ये ठेवलं जात होतं.