`10 हजार द्या मग...`, गंगेत व्यक्ती बुडत असताना सौदेबाजी; पुढे जे घडलं ते माणुसकीला कलंक लावणारं!
Aditya Vardhan Singh: हिंदु धर्मात पवित्र स्थान असलेल्या गंगा नदीपात्रात माणुसकीला कलंक लावणारी घटना नुकतीच समोर आलीय.
Aditya Vardhan Singh: आजकालच्या जगात पैशाला खूपच जास्त महत्व आलंय. पैशापुढे माणूस नाती विसरत चाललाय. जीव गेल्यावर त्याच्या नावे पैसे कमावणारेदेखील आपण पाहिले असतील. पण एखादा व्यक्ती मरणाच्या उंबरठ्यावर असेल तरी आधी पैसे कसे मिळतील, यासाठी मागणी करणारेही अनेकजण आहेत. हिंदु धर्मात पवित्र स्थान असलेल्या गंगा नदीपात्रात माणुसकीला कलंक लावणारी घटना नुकतीच समोर आलीय. या घटनेमुळे माणूस म्हणून आपण किती भावनाशून्य झालोय, हे लक्षात येऊ शकते.
पाण्याचा वेग वाढू लागला आणि...
शनिवारी दुपारचे 2 वाजले होते.उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागातील डेप्युटी डायरेक्टर आदित्य वर्धन सिंह हे उन्नावमध्ये गंगा घाटावर आंघोळीसाठी गेले. आदित्य वर्धन यांच्यासोबत त्यांचे काही मित्रदेखील होते. त्यावेळी नदीच्या पाण्याचा वेग खूपच होता. त्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेले आणि पाण्यात बुडू लागले. आदित्य यांनी मदतीसाठी आपला हात वर केला. ते मदतीसाठी ओरडू लागले.
जीव वाचवण्यासाठी 10 हजारांचा व्यवहार
खासगी लाइफ गार्ड जवळच उपस्थित होते. आदित्य यांच्या मित्रांनी मदतीसाठी लाइफ गार्डकडे विनंती केली. पण लाइफ गार्ड्सना आदित्य यांच्या जीवापेक्षा 10 हजाराची रक्कम मोठी वाटत होती. आधी 10 हजार रुपयाची कॅश द्या मग पुढचं पाहू असे ते आदित्य यांच्या मित्रांना सांगू लागले. मित्रांनी त्यांच्याशी पैशांचा व्यवहार सुरु केला. पण हा व्यवहार सुरु असेपर्यंत मोठा अनर्थ झाला होता आदित्य वर्धन सिंह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते.शनिवारपासून या घटनेला आता 2 दिवस उलटले आहेत. अजूनही आदित्य यांच्यासाठी शोध मोहिम सुरुच आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
'कॅश नसेल तर ऑनलाइन ट्रान्स्फर करा'
शनिवारी दुपारच्या वेळेस आदित्य गंगा नदीत उतरले. त्यांना सुर्यदेवाला अर्घ्य दान करतानाचा फोटो काढायचा होता. या फोटोपायी त्यांनी धोक्याची रेषा कधी ओलांडली हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांना चांगल्या प्रकारे पोहता येत होतं पण नदीच्या पाण्याचा वेग खूपच जास्त होता. यामुळे आदित्य स्वत:ला संभाळू शकले नाहीत. या पाण्याच्या प्रवाहासोबत आदित्य वाहत जाऊ लागले होते. यावेळी आदित्य यांच्या मित्रांनी खासगी लाइफ गार्ड्सकडे त्यांचा जीव वाचवण्याची मागणी केली. पण ते 10 हजार रुपयांवर अडून बसले. आमच्याकडे इतकी कॅश आता नाहीय, असे आदित्यच्या मित्रांनी त्यांना सांगितले. पण पाणबुडे सुरक्षा रक्षक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर त्यांनी ऑनलाइन पेमेंट करण्याची मागणी केली. आदित्य यांच्या मित्रांनी पैसे ट्रान्स्फर केले पण तोपर्यंत आदित्य वाहत खूप दूर पोहोचले होते.
'..तर पाणबुड्यांवर कारवाई करणार...'
गंगेच्या प्रवाहात बुडालेल्या आदित्य यांचा शोध देखील घेतला जात आहे. एसडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन टीम, पोलीस आणि खासगी पाणबुडे हे प्रयत्नांची शर्थ करत आहेत. पण अद्यापही त्यांच्या शोध मोहिमेला यश येताना दिसत नाहीय. आदित्य हे लखनौच्या इंदिरा नगर येथे राहतात. खासगी पाणबुड्यांनी पैसे मागण्याच्या प्रकरणावर डीसीपी राजेश कुमार सिंह यांनी माध्यमांना माहिती दिली. आम्हाला आमच्या स्टीमरमध्ये इंधन टाकायचे होते, यासाठी आम्ही पैशांची मागणी केल्याचे पाणबुड्यांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाणबुड्यांविरोधात केलेल्या आरोपांमध्ये सत्यता आढळली तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.