Osama Bin Laden च्या `या` फोटोमुळे उत्तर प्रदेशमधील सरकारी कर्मचाऱ्याने गमावली नोकरी; कारण...
UP Man Fired For Osama Bin Laden Photo: उत्तर प्रदेशमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये हा कर्मचारी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याच्याविरोधात मागील काही महिन्यांपासून चौकशी सुरु होती आणि तो या प्रकरणात दोषी आढळून आला.
UP Man Fired For Osama Bin Laden Photo: उत्तर प्रदेश राज्यात वीजपुरवठा करणाऱ्या उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (युपीपीसीएल) कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नोकरीवरुन तडकाफडी काढून टाकण्यात आलं आहे. कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका उपविभागीय अधिकाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं असून या व्यक्तीने त्याच्या डेस्कवर दहशतवादी ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) फोटो लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
ओसामा होता आदर्श
युपीपीसीएलने केलेल्या अंतर्गत चौकशीमध्ये उपविभागीय अधिकारी असलेल्या रविंद्र प्रकाश गौतम यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. युपीपीसीएलचे अध्यक्ष एम देवराज यांनी या निर्णयाला सहमती दर्शवल्याने रविंद्र यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. दक्षिणांचल विद्युत वितरण निगमचे व्यवस्थापकीय निर्देशक अमित किशोर यांनी पीटीआय या प्रकरणासंदर्भात माहिती दिली. चौकशीमध्ये रविंद्र यांनी एकदा अलकायदाचा संस्थापक असलेल्या ओसामा बिन लादेनचा उल्लेख 'माझा आदर्श' असा केला होता. रविंद्र यांनी ओसामाचा एक फोटोही आपल्या कामाच्या डेस्कवर लावला होता.
व्हिडीओ व्हायरल झाला अन्...
युपीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्रची जून 2022 मध्ये फारुखाबाद जिल्ह्यातील कयामगंज उपविभागीय कार्यालय-2 येथे बदली झाली होती. त्याचवेळी रविंद्रने 'श्रद्धेय ओसामा बिन लादेन (जगातील सर्वोत्तम इंजिनियर)' असा मजकूर असलेला हा फोटो आपल्या डेस्कवर लावला होता, असं अधिकारी सांगतात. ओसामा बिन लादेन एक उत्तम इंजिनियर आहे, असं रविंद्रचं म्हणणं असल्याचं त्याचे सहकारी सांगतात. रविंद्रच्या ऑफिस रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दक्षिणांचल विद्युत वितरण निगमने रविंद्रविरोधात चौकशी सुरु केली आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला कामावर काढून टाकलं. ही चौकशी आता पूर्ण झाली असून अहवाल समोर आल्यानंतर रविंद्रला कामावरुन कायमचं काढून टाकण्यात आलं आहे.
आधी तात्पुरता सस्पेंड नंतर तो ही गेला अन् फोटोही
ओसामा बिन लादेनचा हा फोटो सरकारी ऑफिसमध्ये लावण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच जून 2022 पासून आतापर्यंत रविंद्रला कामावरुन तात्पुरत्या स्वरुपात सस्पेंड करण्यात आलं होतं. आता अहवालामध्ये रविंद्र दोषी असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रविंद्रला नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्यानंतर ओसामा बिन लादेनचा हा फोटोही त्याच्या डेस्कवरुन काढून टाकण्यात आला आहे.
10 वर्ष अमेरिकेपासून लपून होता ओसामा
ओसामा बिन लादेन हा अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्विन टॉवर पाडण्यामागील हल्ल्याचा मास्टर माइंड होता. या हल्ल्यानंतर ओसामा 10 वर्ष अमेरिकेपासून लपून होता. अखेर 2 मे 2011 साली पाकिस्तानमधील अटोकाबादमधील कारवाईमध्ये अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केला.