Electricity Strike : उत्तर प्रदेशसमोर (Uttar Pradesh) सध्या वीजेचे (Electricity) मोठं संकट उभं राहिलं आहे. उत्तर प्रदेशात सध्या वीजपुरवठा (Electricity Supply) विभागाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. जवळपास 1 लाख वीज कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक शहरे आणि गावांमध्ये वीज नाही. वीज उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठ्यातही अडचण निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री ऊर्जामंत्री ए.के.शर्मा आणि वीज कर्मचारी संघटनेच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली, मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे वीजेचे संकट कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संप मागे घेण्यास कर्मचाऱ्यांचा नकार


16 मार्च रोजी गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर आहेत. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांना बडतर्फ करण्याबरोबरच डझनभर एफआयआरही नोंदवण्यात आले आहेत. आज तकच्या बातमीनुसार, अत्यावश्यक सेवा मेंटेनन्स अॅक्ट (एस्मा) अंतर्गत 22 इलेक्ट्रिशियन्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीही कामगार संप मागे घेण्यास तयार नाहीत.


हायकोर्टाची संपकऱ्यांना नोटीस


अलाहाबाद उच्च न्यायालयाने संपावर असेलेल्या संघटनांच्या नेत्यांविरोधात वॉरंट जारी केले आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वीज विभागाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीसही बजावली आहे. ऊर्जामंत्री ए के शर्मा सातत्याने जिल्हा अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 


दरम्यान, वाराणसीच्या बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे संकटही गडद झाले आहे. शहरी भागापासून खेड्यापाड्यापर्यंत स्थिती अत्यंत वाईट आहे. गावातील नळ बंद असून पिकांना सिंचनाद्वारे पाणी देत नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे वाराणसी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कालभैरव मंदिरात अंधारात पूजा करावी लागली होती. 


तर दुसरीकडे राजधानी लखऊनमध्ये काही भागांमध्ये  वीज पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर आहे. फैजुल्ला गंज परिसरात वीज नसल्याने लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. तक्रार जिल्हाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी  स्वत: उपकेंद्रात जाऊन वीजपुरवठा सुरू केला. जुन्या लखनऊसह इतर भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे.