उंदराची हत्या करणे पडले महागात... पोलिसांनी दाखल केले 30 पानांचे आरोपपत्र
Rat Death Case : उत्तर प्रदेश पोलिसांनी उंदीर मारणाऱ्या आरोपीविरुद्ध 30 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 25 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपीने उंदराला दगडाला बांधून नाल्यात फेकल्यात होते. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपीला काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
Shocking News : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) उंदराची हत्या केल्याचे प्रकरण (Rat Murder Case) सध्या देशभरात गाजत आहे. उंदराला मारणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर उंदराचे शवविच्छेदन केल्यानंतर आता उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) कोर्टात 30 पानी आरोपपत्र (chargesheet) दाखल केले आहे. सोमवारी न्यायालयाने आरोप मान्य करत आरोपपत्र दाखल करुन घेतले आहे. त्यामुळे आता कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात प्राण्यासोबत क्रूरता झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या बदायुमध्ये पानबरिया येथील रहिवासी मनोज कुमार याने घरात उंदीर पकडला होता. त्यानंतर मनोजने उंदराच्या शेपटीला एक दगड बांधला आणि त्याला घराबाहेरील नाल्यात बुडवायला सुरुवात केली. यावेळी तिथून प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा जात होते. विकेंद्र यांनी मनोजला असे करण्यापासून रोखले असता त्याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यातच उंदराचा मृत्यू झाला.
विकेंद्रने याचा व्हिडीओ काढला आणि पोलिसांना तिथे बोलावून घेतले. विकेंद्रने आरोपी मनोजविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि कारवाईची मागणी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच दिवशी आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात नेले. मात्र उंदराचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्ह्यात ती तशी सोई नव्हती. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. मात्र विकेंद्र यांनी हे प्रकरण लावून धरले कायदेशीर कारवाईसाठी शवविच्छेदन करण्याचा निश्चय केला. त्यानंतर उंदराचे शवविच्छेदनासाठी आयव्हीआरआय बरेली येथे नेण्याचे ठरवले. त्यानंतर विकेंद्र पोलिसांसह उंदराचा मृतदेह घेऊन तेथे पोहोचले आणि शवविच्छेदन पार पडले.
उंदराचा शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हा त्यामध्ये उंदराचे यकृत आणि फुफ्फुस खराब झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नाल्याच्या पाण्यात बुडून उंदराचा मृत्यू झाला नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याचा मृत्यू गुदमरल्याने झाला असून तो आधीच अनेक आजारांनी त्रस्त होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे आरोपी मनोजला पोलीस ठाण्यातूनच जामीन मंजूर झाला.
त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे पाच महिन्यांच्या तपासाअंती उंदराच्या हत्या प्रकरणात आरोपी मनोजविरुद्ध 30 पानी आरोपपत्र तयार केले. सीओ सिटी आलोक मिश्रा यांनी सांगितले की, उंदीर मारणाऱ्या आरोपीवर प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोर्टात याप्रकरणी खटला चालवला जाणार आहे.
उंदराच्या हत्येप्रकरणी किती शिक्षा होऊ शकते?
अशा प्रकरणांमध्ये प्राणी क्रूरता कायद्यात 10 ते 2 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. कलम 429 अन्वये पाच वर्षांचा कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. मात्र याआधी अशा प्रकारचे प्रकरण समोर आले नसल्याने कोर्ट मनोजला कोणती शिक्षा सुनावते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.