ओव्हरटेकच्या नादात गेला चौघांचा जीव; ट्रकने धडक दिल्याने कारमध्येच जिवंत जळाले
Saharanpur Accident : उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा जळून कोळसा झाला आहे. महामार्गावर ट्रकने कारला धडक दिल्यानंतर वाहनाने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की कोणालाच बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Saharanpur Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) सहारनपूर (Saharanpur) जिल्ह्यात बायपास हायवेवर एक मोठा अपघात झाला आहे. ट्रकने कारला धडक दिल्यामुळे काही क्षणात संपूर्ण वाहनाने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या पती-पत्नीसह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रामपूर मणिहरन परिसरातील बायपास महामार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. हरिद्वारहून येत असलेल्या अल्टो कारला हा अपघात झाला आहे. या महामार्गाच्या एका बाजूचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने एकाच बाजूने बाहेर काढली जात आहेत. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारला स्फोट होऊन आग लागली. यामध्ये कारमधील वृद्ध दाम्पत्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे मंगळवारी सकाळी 11.30 वाजता हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन जोडप्यांना आपला जीव गमवावा लागला. सहारनपूर येथील डेहराडून-अंबाला महामार्गावरील पुलावर ओव्हरटेक करत असताना ट्रकने कारला जोरदार धडक दिली, ज्यात जोडप्याच्या वाहनाला आग लागली. या अपघातात कारमधील चौघेही जिवंत जळाले आहेत. याची माहिती मिळताच रामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. महामार्गावर बांधकाम सुरू असल्याने एकाच बाजूने दोन्ही दिशेने वाहतूक सुरू आहे. त्याचदरम्यान हा भीषण अपघात घडला आहे.
मृतांची ओळख पटली
मृतांमध्ये उमेश गोयल (70), सुनीता गोयल पत्नी उमेश गोयल (65), अमरीश जिंदाल (55), गीता जिंदाल पत्नी अमरिश जिंदाल (50) हे बसंत विहार ज्वालापूर हरिद्वार येथील रहिवासी आहेत. चौघेही अल्टो कारमधून जात होते. पोलिसांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, या धडकेनंतर कारला एवढी भीषण आग लागली की, त्यांना कारमधून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. काही मिनिटांतच चौघेही जागीच भाजून निघाले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोहोचलेले पोलीस अधिकारीही हे भयानक दृश्य पाहून हैराण झाले. यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण केले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यानंतर गॅस कटरने कार कापून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.