उपचार करण्याऐवजी डॉक्टर Reels बघत राहिला! हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

UP Shocking Video CCTV: रुग्णालयामध्ये या महिलेला आणण्यात आलं त्यानंतर काय काय घडलं याचा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...
UP Shocking Video CCTV: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 60 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मनिपुरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणलेल्या या महिलेकडे 15 मिनिटं कोणी लक्षच दिलं नाही. त्यामुळेच उपचारांना उशीर झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा ड्युटीवर असलेले डॉक्टर आदर्श सेंगर यांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर महत्त्वाचा मानला जाणारा उपचारांचा वेळ वाया घालवला. डॉक्टर रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहत होते असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
नेमकं घडलं काय?
मरण पावलेल्या महिलेचं नाव परवेश कुमारी असं आहे. या महिलेला मंगळवारी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. महिलेच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार, ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी रुग्णाला तपासण्याऐवजी नर्सला रुग्णाकडे पाहण्यास सांगितलं. परवेश कुमारी यांच्या नातेवाईकांनी अनेकदा डॉक्टर सेंगर यांना तुम्ही एकदा रुग्णाला पाहा अशी विनंती केली. मात्र डॉक्टर सेंगर खुर्चीवर बसून आपल्या मोबाईलमध्ये रिल पाहण्यात व्यस्त होते. परवेश कुमारी यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आरडाओरड करुन डॉक्टरांनी आईला तपासावं अशी मागणी केली असता, डॉक्टरांनी या मुलाच्या कानाखाली लगावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यानंतर रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला. अगदी पोलिसांनाही या प्रकरणामध्ये रुग्णालयात बोलवण्यात आलं.
सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
डॉक्टर नेमकं काय करत होते हे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेले आरोप योग्य असल्याचं दिसून आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर खुर्चीवर बसून असल्याचं दिसत आहे. एकीकडे नर्स या महिलेला वाचवण्याचे प्रयत्न करत असताना काही अंतरावर डॉक्टर आपल्या मोबाईलमध्ये रिल्स पाहत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. डॉक्टरांनी मृत महिलेच्या मुलाला कानाखाली मारल्याचंही यात कैद झालं आहे.
मुलगा म्हणतो, "आईच्या तोंडातून रक्त पडलं अन्..."
मृत महिलेचा मुलगा गुरु क्षरण सिंगने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा विनंती करुनही डॉक्टरांनी माझ्या आईकडे पाहिलं नाही. अखेर आईला खोकल्याची जोरदार उबळ आली आणि तिच्या तोंडातून रक्त पडलं. त्यानंतर आरडाओरड सुरु झाल्यावर डॉक्टर त्यांच्या खुर्चीवरुन उठले. मात्र जाब विचारला असता त्यांनी महिलेचा मुलालाच कानाखाली वाजवली. याच दरम्यान या महिलेनं प्राण सोडला.
कारवाई होणार
मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर मदन लाल यांनी हा प्रकार मनिपुरी येथील जिल्हा रुग्णालयात घडल्याचं मान्य केलं आङे. या प्रकरणात रुग्णालयाने तपास सुरु केला आहे. "या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल कळवण्यात आलं आहे," असं डॉ. मदन लाल म्हणाले.