यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढच्या टप्प्यांत व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या मुख्य परीक्षेचा (यूपीएससीने) निकाल गुरुवारी जाहीर केला. या निकालात १९९४ उमेदवार यशस्वी झाले आहेत. या संदर्भातील माहिती लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यांत मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. जाहीर झालेला निकाल लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. किंवा http://www.upsc.gov.in/sites/default/files/WR_CSM18_Eng.pdf या लिंकच्या आधारे तुम्ही निकाल पाहू शकता.
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढच्या टप्प्यांत व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. ही परीक्षा ४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत होणे अपेक्षित आहे. व्यक्तिमत्व चाचणीचे दिल्लीतील धोलपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार ८ जानेवारी २०१९ पासून आपले मुलाखत पत्र (कॉल लेटर) डाऊनलोड करु शकतात. कॉल लेटरसाठी संदर्भात अडचणी असल्यास उमेदवाराने केंद्रीय आयोगाच्या मुख्य कार्यालयात चौकशी करण्याचे आव्हान आयोगातर्फे केले आहे. जे उमेदवार या चाचणीत अपयशी ठरतील, त्या उमेदवारांची यादी, चाचणी नंतरच्या १५ दिवसांनी वेबसाईटवर पाहायला मिळेल. तर ती यादी पुढील ३० दिवसांपर्यत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
यशस्वी उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणीला येताना मूळ कागदपत्रे सादर करायची आहेत. यात जातीचा आणि जन्माचा दाखला आणायचा आहे. सोबतच अन्य कागदपत्रे देखील आणायची आहेत.