Madhya Pradesh Sidhi Viral Video :  फूटपाथवर बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर लघवी केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे.  मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेय. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडिया व्हायरल झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) अंतगर्त आरोपीला शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. 


नेमकं काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फुटपाथवर बसला आहे. दुसरा एक व्यक्ती त्याच्या अंगावर लघवी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पीडीत व्यक्ती हा आदीवासी जमातीतील मजूर असल्याचे समजते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांनी ट्विट करून शिवराज सरकारवर सडकून टीका केली आहे. 


आरोपी भाजपचा नेता असल्याचा दावा


आदीवासी मजूराच्या अंगावर लघवी करणारा व्यक्ती हा भाजपचा नेता असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. हे घाणेरडे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव भाजपच्या माजी आमदाराशी जोडले जात आहे. यानंतर संबधीत आमदाराने ट्वीट करत व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीशी काहीही संबध नसल्याचा खुलासा केला आहे. 


आरोपी फरार 


हा व्हिडीओ बाहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुबरी येथील आहे. हे कृत्य करणाऱ्या आरोपीचे नाव प्रवेश शुक्ला असे असल्याचे समजते. पीडित आणि आरोपी दोघेही कुबरी येथे राहणारे आहेत. या प्रकरणी आरोपीविरोधात 294, 596 आणि एससी-एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच NSA अंतगर्त देखील कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू आहे.