नवी दिल्ली - अमेरिकेने २.४ अब्ज डॉलर्सला भारताला २४ 'एचएच ६० 'रोमियो' सी हॉक' हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला या हंटर हेलिकॉप्टरची आवश्यकता होती. लॉकहीड मार्टिनद्वारा निर्मित हे हेलिकॉप्टर पाणबुड्या आणि जहाजांवर अचूक निशाणा साधण्यास सक्षम आहेत. हे हेलिकॉप्टर समुद्रात शोध घेण्यासाठी तसेच बचाव कामासाठी उपयोगी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी २४ 'एमएच-६० आर' या बहुपयोगी हेलिकॉप्टरच्या विक्रीला मंजुरी  दिली आहे. हे हेलिकॉप्टर भारतीय सुरक्षा दलांना पाणबुडी आणि पाणबुडीविरोधी युद्ध मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यास सक्षम करतील. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रस्तावित विक्रीच्या मदतीने भारत आणि अमेरिकेच्या संबंधात सुधारणा करण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले आहे.


या हेलिकॉप्टर अंदाजे खर्च २.४ अब्ज डॉलर्स इतका आहे. यामुळे भारताला प्रादेशिक भागांतील धोक्यांपासून मदत मिळणार आहे. तसेच सुरक्षा मजबूत करण्यासही मदत मिळणार आहे. हिंद पॅसिफिक आणि दक्षिण आशिया प्रदेशात राजकीय स्थिरता, शांती तसेच आर्थिक प्रगती करण्यासाठी या हेलिकॉप्टरच्या विक्रीमुळे मोठ्या संरक्षण भागीदारांची सुरक्षा स्थिती सुधारण्यास मदत होईल. या हेलिकॉप्टर्सना जगातील सर्वात अत्याधुनिक सागरी हेलिकॉप्टर मानले जात आहे. हिंदी महासागरात चीनची आक्रमकता लक्षात घेता भारतासाठी या हेलिकॉप्टरची मदत होणार आहे.