Chandrashekar Azad Attack : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्यावर जीवघेणा हल्ल्याची घटना समोर आली आहे. सहारनपूरमधल्या देवबंद इथं चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार (Firing) केला. या हल्ल्यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले असून त्यांना देवबंद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चंद्रशेखर आपल्या फॉर्च्युनर कारने देवबंद दौऱ्यावर आले होते. यावेळी अचानक त्यांच्या कारवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. एक गोळी चंद्रशेखर आझाद यांना चाटून गेली. यात ते जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रशेखर आझाद यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराचे काही फोटो आता समोर आले आहेत. चंद्रशेखर आझाद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हरियाणाचा नंबर असलेल्या कारमधून आले  आणि त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार केला. यानंतर त्याच कारमधून ते फरार झाले. गोळीबारात चंद्रशेखर आझाद यांच्या कारच्या काचाही फुटल्या. पोलिसांनी तपास सुरु केला असून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. हल्ला झाला त्यावेळी चंद्रशेखर आझाद दिल्लीहून आपल्या साहरनपूर इथल्या घरी परतत होते. रस्त्यातच देवबंद इथं त्यांच्या कारच्या मागून अचानक एक कार आली आणि कारमधल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार सुरु केला. चार राऊंड फायर करण्यात आले. 


कोण आहे चंद्रशेखर आझाद?
चंद्रशेखर आझाद हे रावण या नावाने ओळखले जातात. ते पेशाने वकील असून सामाजिक कार्यकर्ते आणि भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष-संस्थापक आहेत. 2015 मध्ये चंद्रशेखर यांनी भीमी आर्मी ही संघटना स्थापन केली. उत्तरप्रदेशमध्ये ही संघटना कार्यरत आहे. अनुसूचित जातीतल्या लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध चंद्रशेखर आझाद यांची भीम आर्मी काम करते. जगभरातील 100 उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत टाइम नियतकालिकाने चंद्रशेखर आझाद यांचा समावेश केला होता. 


सहारनपूरमधील जातीय हिंसाचाराच्या घटनेनंतर भीम आर्मी चर्चेत आली. त्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये भीम आर्मी पसरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचारानंतर  'भीम आर्मी' प्रकाशझोतात आली. हिंसाचारात सामील असल्याच्या आरोपावरुन 2017 मध्ये जूनमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.