`रात्री 2 वाजेपर्यंत बैठक मग पहाटे फोन करुन उठवायचे अमित शाह`
मुख्यमंत्र्यांनी सभेला संबोधित करताना विजयाचे एक गुपित सांगितले.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये मोठे यश मिळाल्यानंतर आणि महागठबंधनला मात दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसीत पोहोचले. सोमवारी पंतप्रधान जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्यासोबत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभेला संबोधित करताना विजयाचे एक गुपित सांगितले.
'निवडणुकीच्या धावपळीत थोडा आराम करता येईल का ? असा आम्ही विचार करायचो पण अमित शाह यांचा फोन यायचा. आम्हाला यूपीची 51 टक्के लढाई जिंकण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. रात्री 2 वाजेपर्यंत बैठक व्हायची आणि पुढच्या दिवशी सकाळी 6 वाजता पुन्हा त्यांचा फोन यायचा' असा किस्सा योगी आदित्यनाथ यांनी सांगितला.
यावेळेस उत्तर प्रदेशच्या मतदारांनी जातीवर मत न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत दिले. तेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी सर्वांची इच्छा होती. खूप जणांना पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवायची होती पण रोड शो पाहुनच त्यांनी पळ काढल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभेला संबोधित केले. 2014 मध्ये आम्ही 73 जागा जिंकल्या तेव्हा लोकांना वाटले की हे मोदी लाटेमुळे हे झाले. पण 2017 मध्ये आम्ही तीनशेहून अधिक जागा जिंकल्या आणि सर्वजण हैराण झाल्याचे अमित शाह यांनी म्हटले.