Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेची चांगलीच चर्चा आहे. कोर्टाने 21 वर्षीय महिलेला बलात्कार आणि अपहरणाचे खोटे आरोप केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 2019 साली या महिलेने खोटा जबाब नोंदवल्याने तिने ज्या 25 वर्षीय तरुणावर आरोप केले तो मागील 4 वर्षांहून अधिक काळापासून तुरुंगात आहे. मात्र आता महिलेने केलेले आरोप खोटे असल्याचं सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्या महिलेला शिक्षा सुनावताना जितका काळ तिने केलेल्या खोट्या आरोपांमुळे तरुणाला तुरुंगात रहावं लागलं तितक्याच काळाचा तुरुंगवास सुनावला आहे. कोर्टाने या महिलेला 4 वर्ष 8 महिने सहा दिवसांचा तुरुंगवास सुनावला आहे.


5 लाख 88 हजार तिने तरुणाला द्यावेत; कोर्टाचा आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने या महिलेला 5 लाख 88 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. विशेष म्हणजे हा दंड तिला भरता आला नाही तर तिला अतिरिक्त सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या महिलेला ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम तिने ज्या तरुणावर आरोप केला होता त्याला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सरकारी वकील सुनील पांड्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टाने या तरुणाला देण्यात येणारी रक्कम 5 लाख 88 हजार 822 रुपये निश्चित केली आहे. उत्तर प्रदेश सरकार रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीला जितका रोज देते तो 4 वर्षांच्या कालावधीत किती झाला असता याचा हिशेब करुन ही रक्कम निश्चित करण्यात आली आहे.


कोर्टात नेमकं काय घडलं?


"या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ही महिला सातत्याने तिचा जबाब बदलत होती. उलट तपासणीदरम्यानही ती गोंधळलेली. तिने या तरुणाने तिचं अपहरण करुन बलात्कार केलेला नाही असंही उलट तपासणीदरम्यान मान्य केलं. त्यानंतर तिला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आलं," असं पांड्ये म्हणाले. "त्यानंतर या महिलेला जामीन मंजूर करण्यात आला. मागील महिन्यामध्ये कोर्टाने या प्रकरणातील 25 वर्षीय आरोपीची निर्दोष मुक्तता केली. पुरेसे पुरावे नसल्याने त्याला सोडून देण्यात आलं," असं पांड्ये यांनी सांगितलं. कोर्टाने आयपीसी सेक्शन 195 (खोटे पुरावे सादर करणे) अंतर्गत या महिलेला शिक्षा सुनावली आहे


2019 पासून तुरुंगात होता तरुण


"या प्रकरमामध्ये महिलेला 4 वर्ष 6 महिने आणि 8 दिवसांचा तुरुंगवास सुनावला जात आहे. म्हणजे तिला 1653 दिवसांचा तुरुगंवास तसेच 5 लाख 88 हजार 822 रुपये 47 पैसे दंड ठोठावला जात आहे. तिने दंड भरला नाही तर तिला अतिरिक्त सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल," असं कोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. या प्रकरणात खोटे आरोप करण्यात आलेला तरुण 30 सप्टेंबर 2019 पासून 8 एप्रिल 2024 पर्यंत तुरुंगात होता.