पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील आंबेडकर- त्रिवेंद्र सिंह रावत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील आंबेडकर असल्याचे रावत यांनी म्हटले.
उत्तराखंड : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना संविधान निर्माते डॉ. भीमरराव आंबेडकर यांच्याशी केली आहे. 10 टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरील केंद्राच्या निर्णयानंतर आर्थिकरित्या मागास वर्गाला फायदा होणार आहे. हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. 'सबका साथ, सबका विकास' हे लक्ष्य पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील आंबेडकर असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.
मोदी हे एकवीसाव्या शतकातील आंबेडकर असून त्यांनी गरीब आई वडीलांची मुले, समाजातील सर्व गरीब वर्गाचा विचार केला आहे. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी देशभरातील सामान्य वर्गाकडून खूप वर्षांपासून सुरू आहे. या निर्णयानंतर त्यांना फायदा होणार आहे, असे रावत म्हणाले.
बिल मंजूर
मंगळवारी लोकसभेत आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षणाचे बील पास झाले. आरक्षण संशोधन बिलास लोकसभेमध्ये 323 मतं पडली तर 3 मतं या विरोधात होती. या दरम्यान 326 सदस्य उपस्थित होते. दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांच्या उपस्थितीमुळे हे बिल पास झाले आहे. आज हे बिल राज्यसभेत मंजुरीसाठी जाणार आहे.
60 टक्के आरक्षण
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गासाठी सध्याच्या 50 टक्के आरक्षणाव्यतिरिक्त हे आरक्षण असणार आहे. त्यामुळे आता एकूण आरक्षण 60 टक्के झाले आहे.