मुंबई : उत्तराखंड येथील ऋषीकेश या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मण झुला या नदीवर असणाऱ्या पुलासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पीडब्ल्यूडीकडून या पुलावर वाहनांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. रविवारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय या पुलावरुन जाणाऱ्या वाटसरुंच्या संख्येवरही नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी या ९६ वर्षे जुन्या पुलावरील वाहनांची ये-जा बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. स्थानिक प्रशासनाकडून या निर्णय़ासंदर्भातील माहिती देण्यात आली. पर्यटकांची वाढती संख्या आणि पुलावरुन मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतू पाहता आणि या पुलाचं वयोमान लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातांमुळेही हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ४५० फूट लांबीच्या या लोखंडी पुलाची बांधणी १९२३ मध्ये करण्यात आली होती. उत्तराखंडमध्ये असणाऱ्या ऋषीकेश शहराची ही एक अनोखी आणि असंख्य पर्यटकांना आकर्षित करणारी एक अनोखी ओळख आहे.



पुराणांमध्ये असणाऱ्या उल्लेखांनुसार सध्याच्या घडीला ज्या ठिकाणी हा पूल बांधण्यात आला आहे, त्याच ठिकाणहून भगवान रामाचे बंधू लक्ष्मण हे गंगा नदी एका दोरखंडाच्या पुलाच्या सहाय्याने ओलांडायचे. दरम्यान असंख्य कथा सांगण्यात येणाऱ्या या ठिकाणी सध्याची वाढती गर्दी पाहता येत्या काळात पर्यायी पुलाची बांधणी करण्याचं आश्वासन स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.