वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
Vande Bharat Train Color: देशभरातील महत्वाच्या स्थानकांवर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतेय. वंदे भारतला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून प्रवाशी संख्यादेखील वाढत आहे. ही ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
देशभरात सर्वाधिक पसंतीस पडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला. रेल्वे विभागाने अचानक ट्रेनचा निळा रंग का बदलला ? निळा रंग बदलून भगवा का करण्यात आला? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यावेळी राजकीय कारणांमुळे रंग बदलला असावा असे अनेकांना वाटत होते. आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारतच्या रंगाबाबत खुलासा केला आहे.
कोणतेही राजकीय कारण नाही
पत्रकारांशी संवाद साधताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारतच्या रंगाविषयी भाष्य केले. सर्वप्रथम त्यांनी वंदे भारतला केशरी रंग देण्यामागे कोणतेही राजकीय कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. वंदे भारताच्या या केशरी रंगामागे शास्त्रीय कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनी वैष्णव यांचे स्पष्टीकरण
विज्ञानानुसार आपले डोळे दोन रंग सहज पाहू शकतात. पहिला पिवळा आणि दुसरा केशरी आहे. यामुळेच युरोपमधील सुमारे 80 टक्के गाड्या एकतर केशरी रंगाच्या असतात किंवा मिश्र प्रकारच्या केशरी-पिवळ्या रंगाच्या असतात, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
डोळ्यांसाठी सर्वोत्तम रंग
या दोन रंगांव्यतिरिक्त चांदीसारखे आणखी काही रंग आहेत जे आपल्या डोळ्यांसाठी चांगले मानले जातात. याशिवाय पिवळे आणि केशरी हे आपल्या डोळ्यांसाठी सर्वोत्तम रंग असल्याचे ते म्हणाले.
पहिली ऑरेंज वंदे भारत कोणत्या मार्गावर धावली?
देशातील पहिली ऑरेंज ट्रेन 24 सप्टेंबर रोजी रवाना झाली. पहिली ऑरेंज ट्रेन कासारगोड आणि तिरुवनंतपुरमसाठी धावली होती. या दिवशी पंतप्रधान मोदींनी वंदे भारत ट्रेनच्या 9 पेअर्सना हिरवा झेंडा दाखवला.