रोडरोमिओंना धडा शिकवणार `लिपस्टिक गन`
वाराणसीच्या श्याम चौरसिया यांनी ही रोमिओंची हजेरी घेणारी लिपस्टिक गन तयार केलीय
वाराणसी : छेड काढणाऱ्यांची आता खैर नाही... कारण छेड काढणाऱ्यांना जरब बसवणारी लिपस्टिक गन एका तरुणानं तयार केलीय. या लिपस्टिक गनमुळे चोरांमध्ये दहशत बसेल. आम्ही तुम्हाला लिपस्टिकच्या एखाद्या ब्रँडची माहिती देतोय, असं वाटेल. परंतु, ही दिसायला लिपस्टिक असली तरी ते एक हत्यार आहे. होय या हत्याराचं नाव आहे 'लिपस्टिक गन'...
वाराणसीच्या श्याम चौरसिया यांनी ही रोमिओंची हजेरी घेणारी लिपस्टिक गन तयार केलीय. छेड काढणाऱ्या रोमिओविरोधात ही लिपस्टिक गन तुम्ही वापरु शकता. या लिपस्टिकवर दिलेला ट्रिगर दाबताच त्यातून मोठा आवाज होतो. जवळपास एक किलोमीटर अंतरावरुनही त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, असं लिपस्टिक गनचे निर्माते श्याम चौरसिया यांनी म्हटलंय.
एवढंच नाही जेव्हा तुम्ही लिपस्टिकचा ट्रिगर दाबता तेव्हा तुमच्या घरच्यांना आणि पोलिसांनाही अलर्ट कॉल जातो. त्याच वेळी संबंधित महिलेचं लोकेशन काय आहे? याचीही माहिती घरच्यांना मिळते.
तुम्ही म्हणाल एवढे फिचर्स असलेली ही लिपस्टिक गन खूप महाग असेल. पण असं काही नाही बरं का? अवघ्या साडेसहाशे रुपयांमध्ये ही लिपस्टिक गन तयार होते. शिवाय एक तासात ही गन चार्जही होऊन जाते. त्यामुळं ही लिपस्टिक घेऊन तयार राहा छेड काढणाऱ्या रोमिओंना धडा शिकवायला...