जयपूर: लोकतांत्रिक जनता दलाचे (एलजेडी) अध्यक्ष शरद यादव यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर राजस्थानमधील वातावरण चांगलेच तापले आहे. राजस्थान विधानसभेच्या १९९ जागांसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून शरद यादव यांच्या वक्तव्याचे राजकीय भांडवल केले जात आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे हा केवळ माझाच अपमान नसून समस्त स्त्री जातीचा अपमान असल्याचे सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोगाने शरद यादव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. शरद यादव यांच्या टिप्पणीकडे दुर्लक्ष केले तर चुकीचा पायंडा पडेल, अशी पुस्तीही राजे यांनी जोडली.
 
 शरद यादव यांनी गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अलवार येथील सभेत वसुंधरा राजे यांच्यावर टीका केली. यावेळी भाषणाच्या ओघात यादव यांची जीभ घसरली. त्यांनी म्हटले की, वसुंधराला आराम द्या, ती खूप थकलेय आणि जाडीही झालेय. ती आमच्या मध्य प्रदेशचीच आहे. पूर्वी ती सडपातळ होती, असे यादव यांनी म्हटले. साहजिकच यादव यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला.
 
 यानंतर भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले. शरद यादव यांनी ज्याप्रकारची भाषा वापरली आहे, त्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली पाहिजे. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल, असे वसुंधरा राजे यांनी सांगितले. 
 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यापूर्वीही शरद यादव यांनी अनेकदा महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. २०१७ साली त्यांना अशाच एका विधानामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. मताची किंमत हे मुलीच्या अब्रूपेक्षा जास्त असते. मुलीची अब्रू गेली तर केवळ मोहल्ला किंवा गावाची नाचक्की होते. मात्र, मत विकले गेल्यास संपूर्ण देशाची अब्रू जाते, असे यादव यांनी म्हटले होते.