नवी दिल्ली : बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत हवाईदलाचे वैमानिक सुरक्षित देशात परतले होते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या सर्व वैमानिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. विंग कमांडर अमित रंजन, स्कवार्डन लीडर राहुल बसोया, पंकज भुजडे, बीकेएन रेड्डी, शशांक सिंह यांना हवाईदलाचं पदक दिलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सर्व मिराज 2000 या लढावू विमानाचे वैमानिक आहेत. पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे तळ यांनी उद्धवस्त केले होते. या एअर स्ट्राईकनंतर संपूर्ण जगाने भारताची ताकद पाहिली होती. शिवाय याचं समर्थन देखील केलं होतं.



जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होती. बदला घेण्यासाठी भारतीय जवान संतप्त होते. यावेळी भारतीय हवाईदलाच्या जवानांनी ही जबरदस्त कामगिरी करत पाकिस्तानला जोरदार धक्का दिला होता.


पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 हून अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांना इशारा दिला होता. ज्यामध्ये 250 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.