नवी दिल्ली : तुमचं वजन कमी करा आणि पक्षाचं वजन घटवा, असा टोला उपराष्ट्रपती वैंकया नायडूंनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींना लगावला. राज्यसभेचे 60 खासदार आज निवृत्त झाले. या खासदारांनी राज्यसभेमध्ये समारोपाचं भाषण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझं वजन कमी असल्यापासून मी वैंकया नायडूंना ओळखते, असं रेणुका चौधरी त्यांच्या समारोपाच्या भाषणात म्हणाल्या. अनेक जण माझ्या वजनाची चिंता करतात पण राजकारणामध्ये तुम्हाला तुमचं वजन दाखवायला लागतं, असं रेणुका चौधरी म्हणाल्या. रेणुका चौधरींच्या या वक्तव्यावर वैंकया नायडूंनीही चिमटा काढला. तुम्ही तुमचं वजन कमी करा आणि पक्षाचं वाढवा, हा सल्ला मी तुम्हाला देतो, असं नायडू म्हणाले. नायडूंच्या या वक्तव्यानंतर राज्यसभेमध्ये हशा पिकला.


रेणुका चौधरींच्या हसण्यावरून 'रामायण'


रेणुका चौधरी यांच्या हसण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चा होत असताना पंतप्रधान उत्तर देत होते. मोदी बोलत असताना रेणुका चौधरी हसल्या. रेणुका चौधरींना रोखण्याचा प्रयत्न नायडूंनी केला होता. तेव्हा रामायण मालिका संपल्यानंतर पहिल्यांदा असे हसणे ऐकले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया मोदींनी दिली होती.


राहुल गांधींच्या बैठकीतही हसल्या रेणुका


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांची एक हाय लेव्हल मिटींग बोलवली होती. मिटींगमध्ये राहुल गांधी सर्व नेत्यांची संवाद साधत होते. अशातच रेणुका चौधरी अचानक हसल्या.


पक्षाचे नेते झाले नाराज


नवभारत टाईम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, मिटींगमध्ये उपस्थित कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मिटींगमध्ये जसेही राहुल गांधी म्हणाले की, पक्ष सध्या बिकट परिस्थीतीतून जात आहे आणि सर्व नेत्यांना ही स्थिती बदलण्यासाठी आपलं बेस्ट द्यावं लागेल. राहुल जसेही हे म्हणाले, तेव्हा रेणुका चौधरी जोरजोरात हसू लागल्या. रेणुका यांचं हसणं ऎकताच मिटींगमधील सर्वच नेते शांत आणि गंभीर झाले. तसेच यामुळे पक्षातील अनेक मोठे नाराज झाल्याचेही बोलले जात आहे.


राहुल यांचं भाषण अपूर्ण


बोलताना मध्येच हा प्रकार घडल्याने राहुल गांधी आपलं भाषण अर्धवट सोडूनच खाली नसले. अशीही माहिती आहे की, राहुल खाली बसल्यावरही रेणुका यांचं हसणं काही थांबलं नाही. पण जेव्हा त्यांना याची चुणूक लागली तेव्हा वेळ निघून गेली होती. पक्षाच्या एका नेत्यांनी सांगितले की, मिटींगमध्ये रेणुका यांच्या अशा हसण्याने राहुल गांधी नाराज आहेत. तसेच रेणुका चौधरी यांना पुन्हा कोणत्याही मिटींगमध्ये न बोलण्याचही बोललं गेलं.