Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात Karnataka सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. सत्ताधारी भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) अशी लढत या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून जोरदार प्रचार सुरु झाला आहे. अशातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या ((Siddaramaiah) एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. आधी सिद्धरामय्या हे कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र आता त्यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्याला मारहाण केल्यामुळे सिद्धरामय्या चर्चेत आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कृतीमुळे सिद्धरामय्या नव्या वादात सापडले आहेत. सिद्धरामय्या यांचा मारहाण करतानाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पक्षाच्या एका कार्यकर्त्याला कानाखाली मारली. यावेळी सिद्धरामय्या यांच्या शेजारी कार्यकर्त्यांचा गराडा होता. सिद्धरामय्या यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते तिथे आले होते. त्यावेळीच हा सर्व प्रकार घडला.


सिद्धरामय्या हे घराबाहेर आले त्यावेळी एका कार्यकर्त्यांने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. सिद्धरामय्या यांच्या जवळ जाताच त्यांनी कार्यकर्त्याला काना खाली मारली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे कार्यकर्ते तिकीटासंदर्भात भेट घेण्यासाठी तेथे आले होते. याच दरम्यान ही घटना घडली. मात्र, सिद्धरामय्या यांनी ज्या व्यक्तीला कानाखाली मारली त्याने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर लोक माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत आहेत.



काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर


दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना वरुणमधून तिकीट देण्यात आले आहे. सिद्धरामय्या यांना त्यांच्या मुलाच्या जागेवरून तिकीट मिळाले, तर त्यांना कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. दुसरीकडे निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नसल्या तरी आयोग रविवारी किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करू शकते.