INDIA Bloc Meeting Without Samosa: 'इंडिया' आघाडीची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांनी दिली. मात्र या बैठकीत सहभागी झालेल्या जनता दल युनायटेडच्या एका खासदाराने एक अजब दावा केला आहे. 'इंडिया' आघाडीच्या बैठकीमध्ये समोसे नव्हते. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही असा दावा या खासदाराने केला आहे. आता या दाव्यावरुन 'इंडिया' आघाडीबरोबरच जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांनाही ट्रोल केलं जात आहे.


नेमकं कोणी आणि काय म्हटलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जेडीयूचे खासदार सुनील कुमार पिंटू यांनी एक अजब विधान केलं. पूर्वी इंडिया आघाडीच्या बैठकींमध्ये समोसेही असायचे. मात्र यंदा असं दिसून आलं नाही, असं सुनील कुमार पिंटू म्हणाले. काँग्रेसकडे पुरेसा निधी नसल्याने समोसे दिले नाहीत असा दावाही पिंटू यांनी केला. इंडिया आघाडीच्या या बैठकीला काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबरच शरद पवार, नीतीश कुमार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते.


...म्हणून मिळाला नाही समोसा


कालची बैठक ही चहा आणि बिस्किटांवरच संपली. यापूर्वीही मी सांगितलं होतं की, इंडिया आघाडीची बैठक चहा समोश्यावरच आटोपली जाते. काल मात्र चहा आणि बिस्किटांवरच बैठक संपवण्यात आली कारण काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे पक्ष निधी कमी असल्याचं जाहीर केलं होतं. 138 रुपये, 1380 रुपये असो किंवा 13800 रुपये असो ते लोकांकडून देणगी मागत आहेत. अद्याप देणगी आलेली नाही. त्यामुळेच काल चहा आणि बिस्किटांवरच बैठक संपली. समोसे मिळालेच नाहीत. त्यामुळे कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा न होता काल बैठक संपली.


भाजपाने लगावला टोला


पिंटू यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख असलेल्या अमित मालविय यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे. "इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये समोसा न मिळल्याने नाराज झाले नीतीश कुमार यांच्या पक्षाचे खासदार! कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा झाली नाही, असं ते म्हणाले. जोपर्यंत नीतीश कुमार यांना आघाडीच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं जात नाही तोपर्यंत अशाच पद्धतीच्या तक्रारी येत राहणार," असं म्हणत पिंटू यांच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ अमित मालविय यांनी शेअर केला आहे.



सोशल मीडियावर सध्या पिंटू यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.