पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी गायले `जन गण मन`
पाकिस्तानच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी चक्क भारतीय राष्ट्रगीत `जन गण मन` गायले. या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी चक्क भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन' गायले. पाकिस्तानी विद्यायर्थ्यांच्या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.
भारत-पाकिस्तान या सख्ख्या शेजाऱ्यांमधील पक्के वैर उभ्या जगाला माहिती आहे. या वैराची टसन दोन्ही देशात प्रत्येक क्षेत्रात पहायला मिळते. मग तो क्रिकेटचा सामना असो की, सीमेवरचा तणाव. मात्र, असे असले तरी, कधीतरी दोन्ही देशांमध्ये प्रेमाची हिरवळही पहायला मिळते. नुकत्याच संपन्न झालेल्या ७०व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त ही झलक पहायला मिळाली. पाकिस्तानच्या एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी चक्क भारतीय राष्ट्रगीत 'जन गण मन' गायले. या भारतीय राष्ट्रगीत गायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. अर्थात हा व्हिडिओ म्हणजे भारतासाठी रिटर्न गिफ्ट मानले जात आहे. कारण, यापूर्वी भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत गात व्हिडिओ बनवला होता व तो सोशल मीडियावर अपलोडही केला होता. तो दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचा मॅशप होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही असेच केले आहे.
सोशल मीडियावर व्हॉईस ऑफ राम (VOR) नावाच्या फेसबुक पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीत असेही म्हटले आहे की, या व्हिडिओत भारतीय राष्ट्रगीत गाताना जे विद्यार्थी दिसतात ते लाहोरच्या ख्रिश्चयन यूनिवर्सिटीमध्ये शिकतात. हा व्हिडिओ म्हणजे भारताला रिटर्न गिफ्ट असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. लोकांना हा व्हिडिओ भलताच आवडला आहे.