नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सुरक्षादल आणि स्थानिक दगडफेक करणाऱ्या तरुणांमध्ये तणावाची परिस्थिती आता ओळखीची झालीय. सुरक्षादलाकडून कश्मीरी नागरिकांची हेळसांड होत असल्याचा आरोपही अनेकदा काश्मीरचे दगडफेक करणारे तरुण-तरुणी करताना दिसतात. परंतु, नुकताच या सर्व वादांवर दिलासा देणारा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत एक सीआरपीएफ जवान एका भूकेनं व्याकूळ झालेल्या दिव्यांग चिमुरड्याला जेवण भरवताना आणि त्याची काळजी घेताना दिसत आहे. हिंसेला प्रेमच ठाम प्रत्यूत्तर देऊ शकतं, हाच संदेश या व्हिडिओतून मिळतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ श्रीनगरच्या नवा कदल भागातील आहे. या भागात कायदेव्यवस्था कायम राखण्यासाठी सीआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आलीय. व्हिडिओत दिसणारा जवान हा ४९ व्या बटालियनचा हेड कॉन्स्टेबल इकबाल सिंह आहे.


नुकतंच, दुपारी इकबाल सिंह यांनी आपला जेवणाचा डबा उघडलाच होता तेव्हाच त्यांची नजर जवळच उभ्या असलेल्या एका निरागस चिमुरड्यावर पडली. हा मुलगा हेड कॉन्स्टेबल इकबाल सिंह यांच्याकडे आशेनं पाहत होता. इकबाल सिंह यांनी इशाऱ्यानंच मुलाला 'जेवणार का?' म्हणून विचारलं. चिमुरड्यानंही मान हलवत होकार दिला.



इकबाल सिंह यांनी इशाऱ्यानंच चिमुरड्याला आपल्याकडे बोलावलं. परंतु, प्रयत्न करूनही त्या चिमुरड्याला जागेवरून हलता आलं नाही. त्यामुळे, इकबाल सिंह यांना हा चिमुरडा दिव्यांग असल्याचं तत्काळ लक्षात आलं... मग त्यांनी स्वत:च पुढे होऊन आपल्या हातांनी चिमुरड्याला आपल्याच डब्यातून जेवणं भरवलं.


जेवण संपल्यानंतर इकबाल सिंह यांनी चिमुरड्याला विचारलं 'पाणी पिणार?'... आणि दुसऱ्याच क्षणी चिमुरड्यानं हसऱ्या चेहऱ्यानं इशाऱ्यातच होकार दर्शवला. इकबाल हे चिमुरड्यासाठी पाणीही घेऊन आले आणि त्याला तृप्त केलं. 'वीरता आणि करुणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत' हे इकबाल सिंह यांनी कृत्यातून दाखवून दिलंय. त्यामुळेच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल होतोय.



उल्लेखनीय म्हणजे, नुकत्याच झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळीही इकबाल सिंह घटनास्थळी उपस्थित होते... इकबाल सिंह हे या घटनेचे एक प्रत्यक्षदर्शीही आहेत. या घटनेदरम्यान ते एक वाहन चालवत होते आणि सीआरपीएफच्या अनेक जखमी जवानांना उपचाराकरता हलवण्यासाठी त्यांनी मदत केली होती.