मी मरणाचा विचार सोडलाय, `निर्भया` प्रकरणातील दोषीची याचिका
निर्भया गॅंगरेपमधील दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली
नवी दिल्ली : निर्भया गॅंगरेपमधील दोषी विनय शर्मा याने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. चार दोषींपैकी राष्ट्रपतींकडे गेलेली ही दुसरी दया याचिका आहे. विनयने आपल्या याचिकेत म्हटले, आईवडीलांच्या भेटीचा उल्लेख केला. मला जगण्याची इच्छा नव्हती पण जेव्हा आई-बाबा मला भेटायला आले आणि म्हणाले, बाळा तुला बघून आम्ही जिवंत आहोत..तेव्हापासून मी मरण्याचा विचार सोडला आहे.
दोषी विनयने आणखी एक याचिका दाखल केली. यामध्ये आपले वकील एपी सिंह यांच्या माध्यमातून स्वत: कहाणी राष्ट्रपतींना सांगण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये राहून मानसिक अत्याचार झाल्याचे त्याने यामध्ये म्हटले.
फाशी अटळ
निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आहे. तिहार तुरुंगात या चौघांना फाशी दिली जाईल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोषींकडून शिक्षेची तारीख लांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. न्यायालयाने आज मुकेशची याचिका फेटाळल्यानंतर शिक्षेविरोधात दाद मागण्याचे त्याचे सर्व कायदेशीर प्रयत्न संपुष्टात आले आहेत.
न्यायमूर्ती भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती भानुमती यांनी म्हटले की, राष्ट्रपतींसमोर खटल्याशी संबंधित योग्य कागदपत्रे सादर करण्यात आली की नव्हती, एवढेच पाहणे न्यायालयाचे काम आहे. मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी राष्ट्रपतींसमोर संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवण्यात आली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली, असा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीत २३ वर्षीय निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी अत्याचार केले होते. या अमानुष कृत्यानंतर बसमधून पीडितेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.