भोपाळ : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सांप्रदायिक हिंसा भडकवणाऱ्या दाव्यासहीत एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत एक जखमी गाय रस्त्यावर फिरताना दिसतेय... 'या गायीला काही 'मुस्लिमांनी' बॉम्ब खायला घातला. तोंडात बॉम्ब फुटल्यामुळे ही गाय जखमी झाल्याचा' दावा या व्हिडिओसोबत करण्यात आला होता. 


एखाद्या मूक प्राण्याला इतक्या क्रूर पद्धतीनं जखमी केलं जाऊ शकतं? यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे अल्पावधीतच हा व्हिडिओ वायरल झाला... आणि त्यासोबत केला जाणारा सांप्रदायिक हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करणारा दावाही...


पण, या व्हिडिओची पोलखोल तेव्हा झाली जेव्हा खुद्द मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावरून हा दावा फेटाळून लावतं या व्हिडिओमागचं सत्य लोकांसमोर आणलं. 


भूपेंद्र सिंह यांनी एका हिंदूत्ववादी ट्विटर अकाऊंट 'शंखनाद'वरून ट्विट करण्यात आलेल्या या व्हिडिओला कोट करत या व्हिडिओचं सत्य मांडलंय. 'या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलाय. काही आदिवासी मुलांनी मस्तीमध्ये झाडांत सुअरबॉम्ब लपवला होता... हाच बॉम्ब या गायीनं चावला... सदर भागातील आदिवासी टोळ्या हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, या घटनेत कोणत्याही सांप्रदायिक भडकाव्याचे पुरावे मिळालेले नाहीत' असं भूपेंद्र सिंह यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट केलंय. 



सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात तुम्हीही सांप्रदायिक तणाव भडकावणारा एखादा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असाल, तर त्यापूर्वी त्याची सत्यता नक्की पडताळून पाहा...