`मला भैय्या म्हणायचं नाही,` कॅब चालकाने प्रवाशांसाठी लिहिले 6 नियम; नेटकरी म्हणाले `अस्वच्छता, बंद AC....`
चालकाने आपल्या कारमध्ये प्रवाशांसाठी 6 नियमांची यादीच लिहिली आहे. यामध्ये त्याने प्रवाशांकडून नम्रता, आदर आणि चांगल्या वृत्तीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
कारमधून प्रवास करताना अनेकदा चालक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. हे वाद काही वेळा टोकाला जातात आणि त्यातून काही अनपेक्षित घटनाही घडतात. पण असेच वाद टाळण्यासाठी एका चालकाने आपल्या कारमध्ये प्रवाशांसाठी काही नियम लिहिले आहेत. त्याने दिलेल्या 6 नियमांच्या यादीने सोशल मीडियावर मात्र चर्चा छेडली आहे. चालकाने आपल्या कारमधील प्रवाशांकडून नम्रता, आदर आणि चांगल्या वृत्तीची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच त्याने प्रवाशांना आपल्याला 'भैय्या' म्हणून हाक मारु नये असं सांगितलं आहे. याशिवाय आपल्याला वेग वाढवण्यास सांगू नये अशी ताकीद दिली आहे. यासह आणखी एका नियमाचा उल्लेख आहे ज्यात त्याने दरवाजा जोरात लावू नये असं सांगितलं आहे.
चालकाने प्रवाशांना आठवण करुन दिली आहे की, ही कार त्यांच्या मालकीची नाही. 'तुम्ही कारचे मालक नाही. जी व्यक्ती कार चालवत आहे, ती कारची मालक आहे,' असा नियमच त्याने लिहिला आहे.
चौथ्या नियमात प्रवाशांच्या वृत्तीबद्दल सांगण्यात आलं आहे. "तुमची वृत्ती तुमच्या खिशात ठेवा. फक्त आम्हाला पैसे देता म्हणून कृपया आम्हाला दाखवू नका". तसंच शेवटी, एक महत्त्वाचा सल्ला देण्यात आली आहे. "वेगाने गाडी चालवायला सांगू नका. वेळेवर पोहोचा," असं शेवटी लिहिण्यात आलं आहे.
Reddit वर एका युजरने पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, “मी एक कॅब बुक केली आहे आणि कॅब चालकाने कॅबवर काही मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं?”.
काहींनी त्याचं कौतुक केलं आहे तर काहींनी त्याला 'हक्क' असं म्हटलं आहे. एका युजरने टिप्पणी केली आहे की, "बहुतेक मुद्दे योग्य आहेत, पण आम्हाला भैया म्हणू नका हे काय आहे".
दुसऱ्याने लिहिले, “जोपर्यंत परस्पर आदरासाठी उल्लेख केला जातो तोपर्यंत पूर्णपणे ठीक आहे. दरवाजा हळूवारपणे बंद करणे आणि ड्रायव्हरला त्रास न देणे यासारख्या गोष्टी मूलभूत शिष्टाचार आहेत.” तर एकाने लिहिलं आहे की, “त्याचं म्हणणं बरोबर आहे आणि त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काहीही चूक नाही. आपल्या देशातील लोकांना कॅब ड्रायव्हर्स, डिलिव्हरी करणारे लोक आणि इतरांकडे तुच्छतेने पाहण्याची सवय आहे. खरं तर, हे सामान्य ज्ञान असले पाहिजे”. “या सर्व कॅब इतक्या अस्वच्छ, एसी बंद पडलेल्या आणि दुर्गंधीयुक्त असतात,” अशी तक्रार एकाने केली आहे.