मुंबई: लॉकडाऊन आणि त्यानंतर ऑनलाइन शॉपिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अगदी अत्यावश्यक वस्तू ते घरातील पूजेच्या सामानापर्यंत घरबसल्या अनेक गोष्टी अमेझॉनवरून मागवल्या जातात. त्या वस्तू वापरून झाल्यावर त्याच्या वेळोवेळी प्रतिक्रियाही दिल्या जात असतात. अमेझॉनवर ऑर्डर करताना असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीनं धार्मिक विधींसाठी आवश्यक असणारी वस्तू अमेझॉनवरून ऑर्डर केली. आश्चर्यची गोष्ट म्हणजे ही वस्तू विधींमध्ये न वापरता त्यानं चक्क खाल्ली. त्यानंतर अमेझॉनवर त्याची प्रतिक्रिया देखील दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक धार्मिक विधींमध्ये गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांना विशेष महत्त्व आहे. या शेणाच्या गोवऱ्या चक्क एका व्यक्तीनं केकचा प्रकार समजून अमेझॉनवरून ऑर्डर केल्या. त्या गोवऱ्या आल्यानंतर त्यानं धार्मिक विधीमध्ये वापरण्याऐवजी खाऊन पाहिल्या.  



आता शेणाच्या गोवऱ्या कुणी खातं का?असा लगेच प्रश्न तुमच्याही डोक्यात असेल. अहो या व्यक्तीनं नुसतं त्या शेणाच्या गोवऱ्या चाखून पाहिल्या नाहीत तर त्यावर प्रतिक्रिया देखील दिली. इतकच नाही तर गोवऱ्या तयार करणाऱ्या कंपनीला चार सल्ले देखील दिले.  


डॉ. संजय अरोरा नावाच्या व्यक्तीने याचा स्क्रिनशॉर्ट आपल्या अकाऊंटवर ट्वीट केला आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संजय अरोरा यांनी त्या व्यक्तीनं काय सल्ला दिला हे देखील सांगितलं आहे. हा आहे माझा भारत,ILove my Indiaअसं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे.  


‘या व्यक्तीनं खूपच वाईट कमेंट केली आहे. ही वस्तू खाल्ल्यानंतर मला गवत खाल्ल्यासारखं वाटलं. त्याव्यतिरिक्त त्याची चव मातीसारखी वाटली. कृपया पुढच्या वेळी देताना याची काळजी घ्या. तर अधिक कुरकुरीत आणि चविष्ट असेल याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे. हे खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला लूज मोशनचा त्रास सुरू झाल्याचा उल्लेख त्याने कमेंटमध्ये केला.’  



डॉ. संजय अरोरा यांच्या पोस्टवर तुफान लाईक्स आणि मजेशीर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही जणांनी तर केक समजून त्यानं गोवऱ्या मागवल्याचं देखील म्हटलं आहे. तर काही जणांच्या हे खरंच घडलंय?असा प्रश्नही उपस्थित केला आहे. ट्वीटरवर या पोस्टला 100 हून अधिक लोकांनी कमेंट्स तर साडेपाचशेहून अधिक युझर्सनी रिट्वीट केलं आहे.