दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या डिजीटल इंडियाच्या (Digital India) आवाहनानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कोणतेही काम डिजीटलपद्धतीने करण्यावर भर दिला आहे. आजकाल खरेदीपासून दुसऱ्या शहरातील एखाद्याला घरी बसून भेटवस्तू पाठवणे असो किंवा पैशांचे व्यवहार असोत सर्व काही ऑनलाइन (Online)  झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे लोकांनी खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी डिजीटल पद्धतीने व्यवहार करण्यावर भर दिला आहे. काही भिकारीही आता ऑनलाइन भीक घेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. 


असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने असे काही केले की ज्याचा कोणीही विचारही केला नसेल. या व्यक्तीकडे रोख रक्कम नव्हती त्यामुळे त्याने लग्नाच्या वरातीत ढोलवाल्याला पैसे देण्यासाठी खास जुगाड केला.


'डिजिटल पेमेंट'च्या (Digital Payments) जमान्यात एका वऱ्हाड्याने ढोलवाल्यांवर रोख पैसे न उडवता थेट त्याच्या खात्यातच ते जमा केले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये वरातीमध्ये नाचताना नोटा देण्याऐवजी एका व्यक्तीने ढोल वाजवणाऱ्याचा बार कोड स्कॅन करून त्याला पैसे दिले.
 


काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?


27 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नाचताना ढोलवाल्याला पेटीएम करत असल्याचे दिसून येते. त्या व्यक्तीला नोटा उडवायच्या होत्या, पण आता त्याच्याकडे रोख पैसे नव्हते. त्यानंतर त्याने नवऱ्याच्या डोक्यावरुन दोन दोन-तीन वेळा मोबाईल फिरवला आणि ढोलवरचा बार कोड स्कॅन केला. हे पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 



सुमन रस्तोगी या ट्विटर युजरने बुधवारी ही क्लिप शेअर केली होती. त्याने गंमतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, – बिहारच्या लग्नात पेटीएम करा, तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे भारतीयांना चांगले माहित आहे. आतापर्यंत त्यांच्या या ट्विटला सुमारे सहा हजार लाईक्स आणि ९५० रिट्विट्स मिळाले आहेत. तर हा व्हिडिओ अडीच लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.