Viral Video : एकीकडे दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी वरपासून खालपर्यंत प्रयत्न होतातयत. तर दुसरीकडे माणुसकीचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या. यावेळी बसमधल्या चालक आणि कंडक्टरने वेळेचं भान राखत बस थेट जवळच्या एका रुग्णालयाच्या गेटवर आणली. वेळीच उपचार झाल्याने आई आणि मुलं दोघंही सुखरुप आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
केरळातली (Kerala) ही घटना आहे. केएसआरटीसीची बस (KSRTC Bus) त्रिशूरहून कोझीकोड जात होती. या बसमध्ये एक गरोदर महिला बसली होती. त्यावेळी अचानक महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या आणि महिलेने बसमध्ये मुलाला जन्म दिला. महिला आणि तिचा पती त्रिशूरहून थोट्टीलपलमला जात होते. प्रवासात पेरामंगलम जवळ महिलेने मुलाला जन्म दिला.


महिलेच्या पतीने याची माहिती बसमधल्या कंडक्टर आणि चालकला दिली. वेळेचं गांभीर्याने ओळखत बसच्या चालकाने बसचा मार्ग बदलला आणि बस त्रिशूर इथल्या अमला रुग्णालयात नेली. बस थेट रुग्णालयाच्या दारात उभी केली. त्यानंतर कंडक्टरने रुग्णालयात जाऊन त्याची माहिती दिली. रुग्णालयातील स्टाफने तात्काळ पावलं उचलत बसमधल्या सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि महिलेवर उपचार सुरु केले. महिला आणि मुलं दोघंही सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. महिला आणि नवजात बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.



बस चालक आणि कंडक्टरचं कौतुक
बस चालक आणि कंडक्टरने दाखवलेल्या प्रसंगवधानाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याने आई आणि बाळाचे प्राण वाचले.