एखाद्या व्यक्तीला सीपीआर दिला जात असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या सापाला सीपीआर दिला गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क एका सापाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना व्हिडीओत कैद झाली असून, व्हायरल झाली आहे. कीटकनाशकाने भरलेलं पाणी प्यायल्यानंतर साप अजिबात हालचाल करत नव्हता. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले जात आहे. पण या पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्यावर संशयही उपस्थित केलं जात आहे. एका पशुवैद्याने सांगितलं की, सीपीआरमुळे साप पुनरुज्जीवित होणार नाही. त्याला स्वत:हून शुद्ध आली असावी. 


व्हायरल झालेला हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथील आहे. हा बिनविषारी साप एका रहिवासी कॉलनीमधील पाइपलाइनमध्ये घुसला होता. रहिवासी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण साप काही बाहेर येत नव्हता. यामुळे त्यांनी कीटकनाशकाने भरलेलं पाणी पाईपात ओतलं. यामुळे साप बाहेर पडला. पण यानंतर काय करायचं याची कल्पना नसल्याने रहिवाशांनी पोलिसांना फोन केला.


यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अतुल शर्मा तिथे पोहोचले. आपण स्वयंशिक्षित सर्पमित्र असल्याचा त्यांचा दावा आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी सापाला शोधलं. व्हिडीओमध्ये अतुल शर्मा सापाला जवळ घेऊन न्याहाळत असल्याचं दिसत आहे. तो श्वास घेत आहे का, हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतर त्यांनी सापाला तोंडाने श्वास देत पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच्या तोंडावर पाणी मारलं. यादरम्यान नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती. तसंच त्याच्यावर पाणी टाकत स्वच्छ करत होते. 



यानंतर काही वेळाने सापाने हालचाल सुरु केली असता लोकांनी टाळ्या वाजवून अतुल शर्मा यांचं कौतुक केलं. अतुल शर्मा यांनी यांनी आपण गेल्या वर्षात 500 सापांना वाचवल्याचा दावा केला आहे. तुम्ही हे कुठून शिकला आहात असं विचारण्यात आलं असता, आपण डिस्कव्हरी चॅनेल फार मन लावून पाहतो असं उत्तर दिलं.